मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगातील बहुतांश देशावर थैमान घातलं आहे. भारतात ३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८ हजारापेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधित कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून राज्यात आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सरकारकडून कोरोना चाचणी निशुल्क दरात करण्यात येत असली तरी काही खासगी लॅबना कोरोना चाचणी करण्याची परवानगी सरकारने दिली होती, मात्र या चाचणीचे दर साधारणपणे ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंत होते, सर्वसामान्य रुग्णांना चाचणीचे दर परवडण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली होती, खासगी लॅब आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आता खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे जवळपास निम्म्याने कमी करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यापूर्वी खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी ४ हजार ५०० रुपये घेण्यात येत होते, मात्र आता कोरोना चाचणीचे दर २ हजार २०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर घरातून चाचणीचे नमुने घेऊन जाण्यासाठी २ हजार ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात कोविड १९ चा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आयसीएमआरने आरटी पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या एकूण ४४ शासकीय आणि ३६ खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत प्रयोगशाळानिहाय तपासणी क्षमता, तपासणीचा भर या सर्व बाबींचा आढावा मुख्य सचिवांकडून घेण्यात आला होता. शासकीय प्रयोगशाळेत कोविड १९ ची तपासणी निशुल्क करण्यात येत आहे. पण खासगी प्रयोगशाळेत कोविड १९ तपासणीसाठी लोकांना ४ हजार ५०० रुपये मोजावे लागत होते.
या खासगी प्रयोगशाळेतील चाचणी दरात वाटाघाटी करुन राज्यात कोविड १९ तपासणीचा निश्चित दर ठरवण्यात येणार होता. राज्यातील प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांसोबत वाटाघाटी करुन कमीतकमी दर निश्चित करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली होती. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ जणांची समिती गठीत करण्यात आली होती, यात अजय चंदवाले, अमिता जोशी, आरोग्य सेवा आयुक्तालय संचालक यांचा समावेश होता. या समितीच्या प्रयत्नानंतर ही चाचणी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.