मुंबई : कंटेनमेंट झोन वगळता राज्यात सोमवारी जीवनावश्यक वस्तू नसलेल्या एकल दुकानांनाही परवानगी दिल्यानंतर ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये लॉकडाउनच्या नियमांचे तीनतेरा वाजत अनेक जिल्ह्यांत फळे व भाजीपाल्यासह इतर बाजारपेठांमध्ये गर्दी उसळल्याचे चित्र होते. विविध प्रकारच्या वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईत काही भागांत दारू दुकाने सुरू होती तर काही भागात बंद होती. ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात दारू दुकाने बंद होती. पालघरमध्येही सकाळपासूनच दारू दुकानासमोर रांगा लागल्या होत्या. मात्र दुकाने उघडली नाहीत. रत्नागिरीतील वाईन शॉपसमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लोक उभे होते. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने दुकाने सुरू करण्याबाबत कोणतीच परवानगी न दिल्याने दुकाने उघडली नाहीत.
अहमदनगर जिल्ह्यात मद्य विक्री सुरू झाली. ग्रामीण भागात लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल झाले. दुकाने बंद होती, मात्र रस्त्यावर गर्दी उसळली होती. उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने सकाळी बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती़ मात्र, बाजारपेठेत मोठी गर्दी उसळल्याने काही जणांनी आपली दुकाने पुन्हा बंद केली़ ग्राहकांकडून कोणतीही खबरदारी घेतलेली दिसली नाही. सुरक्षित अंतर राखण्यात अपयश आले़
लातुरात दारू दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी काही जणांना चोप दिला. शहरातील कपड्याची दुकाने, सराफा दुकाने, बांधकाम व्यावसायिकांची दुकाने, झेरॉक्स, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने सुरू झाली आहेत. रस्त्यावरही नागरिकांची गर्दी झाली असून हॉटेलमध्ये आॅर्डर दिल्यानंतर खाद्यपदार्थ मिळण्यालाही सुरुवात झाली आहे.
शिथिलता मिळताच वाशिम बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडाली. वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर येथील बाजारपेठेत नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील दारू दुकाने तुर्तास बंद राहणार आहेत.दारुच्या रांगेत सगळे सारखे; फिजिकल डिस्टन्सचा उडाला फज्जापुणे : एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाची धडपड सुरू आहे. दुसरीकडे दीड महिन्यांपासून घरात बसलेल्या तळीरामांना काही करून आपला ‘थरथराट’ कमी करण्यासाठी दारूहवी आहे. अनेकांनी रात्रीपासूनच दारुच्या दुकानाबाहेर मुक्काम ठोक ला. सोमवारी दारुच्या दुकानांबाहेर लागलेल्या लांबच्या लांब रांगामुळे ‘दारुसाठी वाटेल ते’ करण्याची तयारी अनेकांनी दाखवली. यात मात्र फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.