मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (coronavirus updates) रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात आज दिवसभरात १५ हजार ५१ नव्या रुग्णांची भर पडली असून, ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. (coronavirus updates maharashtra reports 15051 new corona cases and 48 deaths in the last 24 hours)
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात आज (सोमवार) दिवसभरात १० हजार ६७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर, राज्यात १५ हजार ५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आज ४८ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात एकूण ५२ हजार ९०९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९२.०७ टक्के एवढा झाला असून, एकूण २१ लाख ४४ हजार ७४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आताच्या घडीला राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
उस्मानाबाद आणि लातूरमध्ये नाइट कर्फ्यू
राज्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात नाइट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाने मास्क लावल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच कोरोनाचे सर्व नियम, निर्बंध पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाइट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी सांगितले. दररोज नाइट कर्फ्यू आणि रविवारी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्यात विवाह सोहळ्यांना गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्यानं पुन्हा एकदा उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. राज्यात आता विवाह सोहळ्यास फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील इतर सर्व कंपन्यांमध्ये क्षमतेच्या ५० टक्केच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची परवानगी असणार आहे. याशिवाय राज्यातील धार्मिक स्थळांवर भाविकांची मर्यादा व्यवस्थापनाला पाळावी लागणार आहे. यासाठी दर तासाभरात मर्यादित भाविकांना परवानगी देण्याची व्यवस्था धार्मिक स्थळांनी करावी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.