टंचाई अंतर्गत दुरुस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार?
By admin | Published: May 19, 2016 02:02 AM2016-05-19T02:02:16+5:302016-05-19T02:02:16+5:30
पुरंदर तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या टंचाई आराखड्याअंतर्गत सध्या दुरुस्तींची कामे सुरू झालेली आहेत;
जेजुरी : दुष्काळी परिस्थितीत पिचणाऱ्या पुरंदर तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या टंचाई आराखड्याअंतर्गत सध्या दुरुस्तींची कामे सुरू झालेली आहेत; मात्र यातील अनेक योजनांच्या दुरुस्त्यांची गरज नसतानाही खर्च टाकून कामे सुरू करण्यात आलेली आहेत. या कामातून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने बोगस अंदाजपत्रके तयार करून, मोठ मोठा खर्च टाकून भ्रष्टाचार होत असल्याचा संशय काही ग्रामपंचायतींनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्वरित चौकशी करण्याची मागणी आहे.
शासनाकडून टंचाई अंतर्गत आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्त्यांसाठी खर्चाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून तालुक्यातील सर्वच प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांची टंचाई आराखड्यातून दुरुस्त्यांची अंदाजपत्रके तयार करून, जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळविण्यात आली आहे. त्याचे रीतसर आॅनलाइन टेंडरही निघालेली आहेत. मात्र, योजनांची दुरुस्ती ठेकेदारांकडून परस्पर होत असल्याने ग्रामपंचायती संभ्रमात आहेत. नाझरे जलाशयावरून नाझरे व इतर चार गावे या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी टंचाई आराखड्यातून दुरुस्ती केली जात आहे. त्याची टेंडरही निघालेली आहेत. यात नाझरे क. प. १४ लाख ९८ हजार, नाझरे सुपे ८ लाख २४ हजार, पांडेश्वर ९ लाख ५४ हजार, जवळार्जुन १४ लाख ९५ हजार, असे एकूण अंदाजे ४८ लाखांची दुरुस्ती दाखवली आहे.
या कामाबाबत नाझरे सुपे आणि नाझरे क.प. या ग्रामपंचायतींना याबाबतची काहीच माहिती नाही. याउलट नाझरे सुपे या ग्रामपंचायतीकडून १४ व्या वित्त आयोगातून योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. टंचाई आराखड्याअंतर्गत या योजनेच्या दुरुस्तीवर खर्च होत आहे, असे माहीत असते तर ग्रामपंचायतीने वेगळा खर्च केलाच नसता. पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलेले नाही.
- प्रभाकर कापरे,
उपसरपंच, नाझरे सुपे