‘सीपीएस’ची तक्रार पंतप्रधानांकडे
By Admin | Published: November 3, 2016 05:28 AM2016-11-03T05:28:15+5:302016-11-03T05:28:15+5:30
कॉलेज आॅफ फिजिशियन अॅण्ड सर्जन (सीपीएस) मध्ये गेल्या वर्षी ३० टक्के गुजरातच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे
मुंबई : कॉलेज आॅफ फिजिशियन अॅण्ड सर्जन (सीपीएस) मध्ये गेल्या वर्षी ३० टक्के गुजरातच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, तर प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि अन्य व्यवहारांमध्ये सीपीएसमध्ये सावळा गोंधळ सुरू असून, भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार आयएमएने पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे. प्रवेशासाठी, परीक्षेत पास होण्यासाठी पैसे मागितले जातात. त्याचबरोबर, अन्य आर्थिक व्यवहारात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आयएमएने केला आहे. आयएमएने पंतप्रधानांना पत्र पाठवून ही व्यथा मांडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, २०१७चे प्रवेश सीपीएसमध्ये नीटतर्फे होणार आहेत, पण अजूनही परीक्षा प्रक्रियेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने ज्या केंद्रात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, त्या ठिकाणच्या तपासण्या करणे आवश्यक आहे, पण असे कोणतेच प्रकार होत नाहीत. विद्यापीठाचे प्रतिनिधी परीक्षेवेळी तिथे हजर असणे आवश्यक आहे. मात्र, या नियमांची पायमल्ली होत असल्याने तक्रार केल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. परीक्षेमध्ये पारदर्शकता यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून आम्हाला उत्तर आले असून, याविषयी संबंधित विभागांना सांगून चौकशी करण्यात येईल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटल्याचे डॉ. लेले यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)