नव-उद्योजकांची फळी निर्माण करणार - राज्यपाल
By admin | Published: May 10, 2015 12:41 AM2015-05-10T00:41:22+5:302015-05-10T00:41:22+5:30
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भारताच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. कृषी क्षेत्रापाठोपाठ या क्षेत्रात रोजगार निर्मिती
मुंबई : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भारताच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. कृषी क्षेत्रापाठोपाठ या क्षेत्रात रोजगार निर्मिती, समतोल विकास तसेच सर्वसमावेशक वृद्धीची क्षमता आहे. याशिवाय या क्षेत्रात नवनिर्मितीला मोठा वाव आहे. या सर्व अनुकूल स्थितिचा लाभ घेऊन राज्यात मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योग स्थापन करण्यासाठी राज्यात नव-उद्योजकांची फळी निर्माण करण्याचे आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.
राज्याचा उद्योग विभागाने आयोजित केलेल्या ‘लघु उद्योग परिवर्तनातुन महाराष्ट्र परिवर्तनाकडे’ या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.आज ई-कॉमर्सच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक उलाढाली होत आहेत, याचा उल्लेख करून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाच्या उत्पादनांना व सेवांना देशातील तसेच जगातील बाजारपेठ खुली व्हावी या करिता ई-कॉमर्सचा उपयोग करण्याबद्दल विचार व्हावा असे राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्राने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाची उत्पादने व सेवा यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करावे अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
महाराष्ट्राची स्पर्धा इतर राज्यांशी नसून प्रगत राष्ट्रांशी आहे, इतका महाराष्ट्र उद्योगांच्या बाबतीत समर्थ आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले.यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव माधव लाल, राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी व राज्याच्या सर्व विभागातून आलेले लघु उद्योजक उपस्थित होते.