जवान मॅथ्यूच्या आत्महत्त्येप्रकरणी महिला पत्रकारावर गुन्हा
By admin | Published: March 28, 2017 04:42 PM2017-03-28T16:42:14+5:302017-03-28T18:04:08+5:30
मॅथ्यू यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिल्लीमधील एका महिला पत्रकारासह सेवानिवृत्त लष्करी जवानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नाशिक : देवळाली कॅ म्प परिसरातील लष्करी हद्दीमधील एका पडक्या घराच्या २ मार्च रोजी जवान रॉय मॅथ्यू याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. मॅथ्यू यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिल्लीमधील एका महिला पत्रकारासह सेवानिवृत्त लष्करी जवानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या हद्दीतील महिंद्र हेगलाइन येथे दिल्लीच्या द क्विंट न्यूज चॅनलच्या पत्रकार संशयित पूनम अग्रवाल (रा. दिल्ली) व सेवानिवृत्त जवान दीपचंद (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांनी अग्रवाल यांना सैन्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला तसेच त्यांना छायाचित्रण करण्यासही सांगितले. यासाठी त्यांनी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचे समजते. यावेळी मॅथ्यू यांचेही छायाचित्रण करण्यास त्यांनी सांगितले. या छायाचित्रणाची चित्रफीत चुकीच्या पध्दतीने २४ फेब्रुवारी रोजी सादर केला. यामुळे लष्कराची बदनामी होईल, अशा पध्दतीने हा व्हिडिओ व्हायरल केला. यामुळे मॅथ्यू तणावाखाली आले होते. त्यामुळे त्यांनी २ मार्च रोजी गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याचे उघडकीस आले होते. या संपूर्ण घटनेप्रकरणी देवळाली कॅम्प येथील आर्टीलरी स्कूल (तोफखाना)चे लान्सनायक नरेशकुमार , अमितचंद्र जाटव यांनी दिल्लीच्या संशयित महिला पत्रकार आणि सेवानिवृत्त लष्करी सेवेतील दीपचंद यांच्याविरुध्द फिर्याद देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक लोहकरे करीत आहेत.