‘त्या’ पोलिसाचा ‘गुन्हा’ माफ
By admin | Published: January 4, 2016 02:43 AM2016-01-04T02:43:17+5:302016-01-04T02:43:17+5:30
मुंबई पोलीस दलात ‘आॅनड्युटी’कार्यरत असताना, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना गुलाबपुष्प दिल्याप्रकरणी शिक्षा करण्यात आलेल्या पोलीस हवालदार प्रमोद तावडे यांचा तो गुन्हा आता माफ झाला आहे
जमीर काझी , मुंबई
मुंबई पोलीस दलात ‘आॅनड्युटी’कार्यरत असताना, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना गुलाबपुष्प दिल्याप्रकरणी शिक्षा करण्यात आलेल्या पोलीस हवालदार प्रमोद तावडे यांचा तो गुन्हा आता माफ झाला आहे. राज्य सरकारने त्यांच्या या कृतीबाबत तीन वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा रद्द करून, पुन्हा असे ‘कृत्य’ न करण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. ४० हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करणाऱ्या तावडेंवर केलेल्या कारवाईबाबत कर्मचारी व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.
तीन वर्षांपूर्वी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत मोठा मोर्चा काढला होता. त्यावेळी तावडे यांनी राज यांना गुलाबपुष्प दिले होते. त्याबाबत वायरलेस विभागाच्या तत्कालीन उपायुक्तांनी केलेल्या शिक्षेविरुद्ध त्यांनी गृहविभागाकडे
दाद मागितली होती. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे झालेल्या सुनावणीनंतर ही शिक्षा रद्द
करण्यात आल्याचे आदेश जारी केले आहेत.
तीन वर्षांपूर्वी रझा अकादमीने ११ आॅगस्ट २०१३ रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. त्या वेळी काही समाजकंटकांनी वाहनांची जाळपोळ करीत, बंदोबस्तावरील पोलिसांवर हल्ला केला होता. त्यांच्या निषेधार्थ आणि तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील व पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांची तत्काळ हकालपट्टी करावी, या मागणीसाठी राज ठाकरे यांनी २१ आॅगस्टला मोर्चा काढला होता.
आझाद मैदानावर समारोपाचे भाषण झाल्यानंतर तेथे ड्युटीवर असलेल्या प्रमोद तावडे यांनी व्यासपीठ गाठून राज यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत देऊन, आपल्यावरील अन्यायाची कैफियत मांडली होती.
या घटनेनंतर वायरलेस विभागात नियुक्तीला असलेल्या तावडेचे आझाद मैदान पोलीस, आयुक्त मुख्यालय व वायरलेस मुख्यालयाने जबाब घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ कलम ३,५ व ६ अंतर्गत ठपका ठेवला. नेमून दिलेल्या ड्युटीच्या ठिकाणी न जाणे, तसेच ‘आॅनड्युटी’ राजकीय व्यासपीठावर जाणे, आयुक्त व गृहमंत्र्यांबाबत अनुद्गार काढल्याप्रकरणी पोलीस शिक्षा व अपील नियम १९५६ च्या नियम ३ अंतर्गत त्यांना शिक्षेस पात्र ठरवण्यात आले.
मुंबई पोलीस कायदा १९५१ मधील २५ (१)(अ) नुसार आगामी वार्षिक वेतनवाढ ३ वर्ष रोखण्याची शिक्षा तत्कालीन उपायुक्त बी. एस. यादव यांनी केली होती. त्या विरुद्ध तावडे यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग, तसेच पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्याकडे अपील केले. मात्र, त्यांनी ही शिक्षा रद्द करण्यास असमर्थता दर्शवित गृहविभागाकडे अर्ज पाठवण्यात आला.
राज्य सरकार बदलल्यानंतर सध्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी प्रलंबित प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यात तावडे यांनी आपण
नेमून दिलेले कर्तव्य पार पाडून
आझाद मैदानावर गेलो होतो.
त्यानंतर हल्ल्यामुळे खच्चीकरण झालेल्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविल्याबाबत राज ठाकरे यांना धन्यवाद देण्यासाठी व्यासपीठावर गेलो. वडाळा ट्रॅफिक विभागात नियुक्तीला असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयसीएफ) जवानांनी केलेल्या मारहाणीबाबत खात्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्याबाबत प्रसारमाध्यमांकडे खंत व्यक्त केली होती.
त्यामध्ये खात्याच्या बेअदबी करण्याचा काही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी तावडे यांची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा कठोर असल्याने ती रद्द केली. केवळ अशी ‘कृती’ पुन्हा न करण्याबाबत मात्र, त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.