मराठवाड्यातील सर्वपक्षीयांची मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘एसपीए’ पळविले पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 03:15 AM2017-12-24T03:15:04+5:302017-12-24T03:15:17+5:30
मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा कोणताही मोठा प्रकल्प औरंगाबादेत येण्यापूर्वीच त्याला पळवून नेण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील शिखर समजली जाणारी ‘आयआयएम’ संस्था नागपूरला पळवून नेण्यात आली.
औरंगाबाद : मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा कोणताही मोठा प्रकल्प औरंगाबादेत येण्यापूर्वीच त्याला पळवून नेण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील शिखर समजली जाणारी ‘आयआयएम’ संस्था नागपूरला पळवून नेण्यात आली. त्या मोबदल्यात स्कूल आॅफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट (एसपीए) ही संस्था औरंगाबादला देण्यात आली होती. ही संस्थाही पुण्याला पळवून नेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
आयआयएम नागपूरला नेल्यानंतर मराठवाड्याच्या जनतेने तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मराठवाड्याचा रोष लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्वरित स्कूल आॅफ प्लॅनिंग ही संस्था देण्याचे आश्वासन दिले. आता औरंगाबादहूनही ही संस्था पुण्याला नेण्यात आल्यास आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही. त्यासाठी तीव्र जनआंदोलन उभे करण्यात येईल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत वाल्मी येथील कार्यक्रमात एसपीए औरंगाबादला मंजूर झाल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्रीच प्रकाश जावडेकरांना ही संस्था पुण्याला नेण्यासाठी पत्र देत असतील, तर गंभीर बाब आहे. हा अन्याय आपण होऊ देणार नाही. जावडेकरांनाही पत्र पाठवून ही प्रक्रिया थांबविण्यात येईल. गरज पडली तर सेना स्टाईल आंदोलनही करण्यात येईल, असे खा. चंद्रकांत खैरे म्हणाले.
शिवसेना-भाजपा युतीने नेहमीच मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागील तीन वर्षांमध्ये या विभागावर फक्त आणि फक्त अन्याय शासनाने केला आहे. मी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. युतीला भरभरून मतदान करणाºया जनतेने याचा कुठेतरी विचार करावा, असे आमदार सतीश चव्हाण म्हणाले. तर सर्व काही पुण्याला देणार असाल, तर या भागाचा विकास कसा होईल.?
याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. या मुद्यावर सेना, राष्टÑवादी आदी पक्षांना सोबत घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी आंदोलन उभे करण्यात येईल, असे आ. इम्तियाज जलील यांनी सांगितले.