घन घन मंगल गावो... बजावो..

By admin | Published: August 13, 2014 12:48 AM2014-08-13T00:48:12+5:302014-08-13T00:48:12+5:30

अभिजात शास्त्रीय संगीताचे उपासक व सलग ४२ वर्षे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती शांतिनिकेतन येथे भारतीय संगीताचे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले मूळ नागपूरवासी

Cube Cube Mars | घन घन मंगल गावो... बजावो..

घन घन मंगल गावो... बजावो..

Next

वझलवार स्मृती संगीत समारोह : गायन व वादनाची पर्वणी
नागपूर : अभिजात शास्त्रीय संगीताचे उपासक व सलग ४२ वर्षे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती शांतिनिकेतन येथे भारतीय संगीताचे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले मूळ नागपूरवासी प्रा. विद्याधर व्यंकटेश वझलवार यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. गुरुदेवांच्या सानिध्यात राहण्याचे व बहुसंख्य बंगाली संगीतप्रेमी विद्यार्थ्यांना शास्त्रीय रागसंगीताचे चपखल मार्गदर्शन करण्याचे भाग्य लाभलेल्या प्रा. वझलवार यांच्या या स्मृती समारोहात सुरुवातीला काही ज्येष्ठ संगीततज्ज्ञांचा आत्मीय सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे शास्त्रीय गायन व प्रतिभावान कलाकार पंडित वाल्मिक धांडे यांचे संतूर वादन हे या संगीत सभेतील सादरीकरण होते.
शांतिनिकेतन आश्रमातील कुठल्याही विशिष्ट देवतेची मूर्ती नसलेल्या संपूर्ण काचेच्या ब्रह्ममंदिरात उपनिषदातील श्लोक पठनाचा सन्मान प्राप्त असणाऱ्या प्रा. वझलवारांची सांगीतिक परंपरा निष्ठेने जपणारे त्यांचे सुपुत्र प्रा. आनंद वझलवार यांच्या त्याच पवित्र सादरीकरणासह समारोहाचा आरंभ झाला. पंडितजींच्या सुकन्या व रवींद्र संगीताच्या सुमधूर गायिका अरुंधती विनोद देशमुख यांनी रवींद्र संगीतातील बंगाली रचनेचे भावपूर्ण सादरीकरण केले. आपल्या दीर्घ संगीत साधनेसह शास्त्रीय संगीताचे दालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीत तज्ज्ञांसह वझलवार कुटुंबीयांना आयोजन सहकार्य करणाऱ्या काही स्नेहीजनांचा विशेष सत्कार समारोहाचे अध्यक्ष व ज्येष्ठ संगीत रसिक बाबासाहेब उत्तरवार यांच्या हस्ते करण्यात आला. यात पंडितजींचे शिष्य व ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉ. बाळासाहेब पारखी, गायनाचार्य डॉ. उषा पारखी, पं. पुरुषोत्तम उपाख्य भैय्याजी सामक, पं. आबासाहेब इंदूरकर, पं. मधुसूदन ताम्हणकर, डॉ. बाळासाहेब पुरोहित, डॉ. राम म्हैसाळकर, डॉ. नारायण मंग्रुळकर, तसेच बंगाली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, बंगाली असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, वसंतराव कुलकर्णी, दत्ताभाऊ खानझोडे यांचा समावेश होता.
यानंतर सुविख्यात गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांच्या सुमधुर गायनाने या आयोजनाचा आनंद अधिकच द्विगुणीत झाला. त्यांनी राग रागेश्रीसह गायनाची सुरुवात केली. शास्त्र नियमांच्या चौकटीत राहून सौंदर्यविषयक प्रणालीतून रागाची सुरेलतेने झालेली बढत, निकोप-सुरेल स्वर, लयकारीचे मोहक विभ्रम अशा स्वरूपाचे हे बुद्धी-भावनाप्रधान सुश्राव्य सादरीकरण होते. त्यानंतर विदर्भातील एकमात्र अग्रणी संतूरवादक पं. वाल्मिक दांडे यांचे नितांत श्रृतीमधूर संतुर वादन झाले. वादकाचे कलमांवरील प्रभुत्व, गायकी अंगाच्या राग चलनात संतूर ठेवण्याचे कौशल्य व अल्पवेळेतील सुरेल सादरीकरण यासह या समारोहाला चार चाँद लागले. यावेळी पं. वझलवार यांचे नातू व नवोदित कलाकार तसेच पं. वाल्मिक धांडे यांचे शिष्योत्तम प्रवीण झाडगावकर यांनीही राग चारुकेशीसह सुरेल संतूर वादन करून आपल्या प्रतिभेचा परिचय दिला. या समारोहाचे नेटके संचालन विनोद देशमुख यांनी केले. तर कलाकार व अतिथींचे स्वागत प्रा. आनंद वझलवार, चंद्रशेखर मुजुमदार यांनी केले.
संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार, संगीतप्रेमी व मराठी-बंगाली रसिक यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Cube Cube Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.