भार्इंदरच्या पालिका शाळेत गटारीचा झिंगाट
By admin | Published: August 2, 2016 02:16 AM2016-08-02T02:16:39+5:302016-08-02T02:16:39+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माशाचापाडा शाळेत रविवारी डीजेच्या तालावर गटारीची जंगी पार्टी झोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली
भार्इंदर : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सात कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या हजेरी शेडमध्ये आॅन ड्युटी ‘गटारी’ केल्याची बातमी ताजी असतानाच मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माशाचापाडा शाळेत रविवारी डीजेच्या तालावर गटारीची जंगी पार्टी झोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजपा नगरसेवक व प्रभाग समिती-६ चे सभापती अनिल भोसले यांच्या पुढाकाराने ही पार्टी झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. मात्र, त्याची चौकशी सुरू असल्याचे आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले.
भोसले यांनी आपल्या समर्थकांना खूश करण्यासाठी रविवारी काशीगावच्या माशाचापाडा येथील पालिका शाळेत गटारीचा बेत आखला होता. रविवारी शाळा बंद असल्याने त्याची चावी परिसरातच राहणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडे देण्यात आली होती. ती आणण्यासाठी भोसले यांनी काही तरुणांना त्यांच्याकडे पाठवले. परंतु, ते घरी नसल्याने त्यांच्या पत्नीने चावी देण्यास नकार दिला. अखेर, भोसले यांनी आपल्या सभापतीपदाचा वापर करीत चावी मिळवली. त्यानंतर, दुपारी ३ वाजल्यापासून शाळेच्या आवारात डीजेच्या तालावर गटारीचा झिंगाट सुरू झाला. मद्यपींनी जेवणखाण झाल्यानंतर शाळेच्याच परिसरात उष्टे-खरकटे टाकले. तसेच साफसफाईही केली. याविरोधात शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रारही करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही.
या गटारीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याचे भान मात्र भोसले व त्यांच्या समर्थकांना राहिले नाही. या संतापजनक प्रकाराला पालिकेचे शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. आयुक्त हांगे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत देशमुख यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
।आपल्याकडे या प्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाही. शिवाय, तशी नोंदही नसल्याने कारवाई झाली नाही.
- विलास सानप, वरिष्ठ निरीक्षक, काशिमीरा पोलीस ठाणे