उजनीत होतोय धोकादायक जलप्रवास
By admin | Published: July 15, 2017 01:27 AM2017-07-15T01:27:00+5:302017-07-15T01:27:26+5:30
३५ ते ३६ किलोमीटर अंतराच्या उजनी पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात सर्रास कायद्याला फाटा देऊन धोकादायक पद्धतीने जलप्रवास केला जात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : तालुक्यातील भिगवण ते तरटगाव अशा सुमारे ३५ ते ३६ किलोमीटर अंतराच्या उजनी पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात सर्रास कायद्याला फाटा देऊन धोकादायक पद्धतीने जलप्रवास केला जात आहे. पाणलोटक्षेत्रात अशा अनेक जागा आहेत, तिथे लोकांच्या जिवावर बेतू शकते. मात्र, त्याबाबत कसलीही खबरदारी घेतली जात नाही.
लोणी देवकरपासून इंदापूर शहराकडे येणाऱ्या पाणलोटक्षेत्राच्या पट्ट्यात कळाशी, शिरसोडी, गंगावळण, पडस्थळ या भागांतून करमाळा तालुक्यातील चिखलठाण, चिखलठाण नंबर २, दहिगाव, कुगाव, पोपळज, जेऊर, शेटफळ, सोगाव या भागात लाँच व होड्यांद्वारे जलवाहतूक केली जाते. या गावांचे इंदापूरपासूनचे अंतर केवळ तीन ते पाच किलोमीटरएवढे आहे. त्यामुळे दवाखाना, शिक्षण, शेतीसाहित्य याकरिता त्या भागातील लोक, विद्यार्थी इंदापुरात येतात. दररोज किमान पाचशे ते हजार लोक तालुक्यात येत असतात. एकट्या पडस्थळमध्ये ही संख्या चारशे ते पाचशेएवढी आहे. एका लाँचमध्ये वीस ते बावीस माणसांबरोबर अवजड दुचाक्यांची दाटीवाटीने कोंबाकोंबी करून हा प्रवास धोकादायक असतो. या भागातील नदीपात्रातल्या खोलीचा अंदाज कुणालाही लागत नाही. त्यामुळेही जीव मुठीत धरून प्रवास केला जातो.
>पडस्थळच्या जलवाहतुकीस कायदेशीर परवानगीची मागणी
कोटलिंगनाथाच्या देवालयामुळे प्रसिद्ध असणाऱ्या पडस्थळ गावातून एक लाँच पडस्थळ ते चिखलठाण अशी प्रवासी वाहतूक करीत होती. चारशे ते पाचशे लोक दररोज ये-जा करीत होते. वादामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रवास बंद आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोंगाणे व नितीन झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पडस्थळला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आम्ही ग्रामस्थ गेल्या वीस वर्षांपासून करीत आहोत. पण त्याची दखल घेतली जात नाही. येथील जलवाहतूक, दळणवळणास कायदेशीर दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
>अजोती परिसरात आता एकाच होडीने जलप्रवास
याच वर्षी दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उजनी पाणलोटक्षेत्रातील अजोती गावाजवळ नदीपात्रात नौकाविहार करताना बोट उलटली होती. या दुर्घटनेत डॉ. सुभाष ज्ञानदेव मांजरेकर (अकलूज, ता. इंदापूर, माळशिरस), डॉ. महेश पोपट लवटे, डॉ. अण्णा शिंदे, चंद्रकांत लक्ष्मण उराडे (सर्व रा. नातेपुते, माळशिरस) हे चौघे जण बुडून मरण पावले होते. ही आठवण अजून ताजीच असणाऱ्या अजोती गावाची पाहणी केली असता, त्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार या गावात शेतीबरोबरच मासेमारी हा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावात मासेमारीसाठी वापरात येणाऱ्या जवळपास पन्नास ते साठ होड्या आहेत. नदीपात्रात जाळी सोडून आल्यानंतर या होड्या किनाऱ्याला बांधून ठेवल्या जातात. काही उत्साही लोक कुणाची परवानगी न घेता बांधलेल्या होड्या सोडून नौकाविहार करतात. हाच प्रकार दि. ३० एप्रिल रोजी घडला होता.