पुणे : मोबाइल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या युवकाचा स्वारगेट पोलीस स्टेशनमधील कोठडीत गुरुवारी मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येणार आहे.
अजित अलापा पुजारी (वय २०, रा. सध्या घोरपडीगाव. मूळ रा. भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अजित हा मूळचा कर्नाटक राज्यातील आहे. बहिण आणि दाजी पुणे शहरात राहत असल्यामुळे तो चार दिवसापूर्वी पुण्यात आला होता. गुरुवारी दसरा असल्याने तो फुले आणण्यासाठी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा दाजी यलप्पा तिमाप्पा पुजारी (वय ३० रा. घोरपडीगाव) याच्यासोबत दुचाकीवरून मार्के टयार्ड येथे गेला होता. दरम्यान तेथे साध्या वेशात असलेल्या दोन पोलिसांनी मोबाईल चोरल्याच्या संशयावरून अजितसह यलप्पाला ताब्यात घेतले आणि जीपमध्ये बसवून स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणले.
दोघांकडे पोलिसांनी दोघांकडे चौकशी सुरू केली. मात्र अजितला मराठी आणि हिंदी समजत नव्हती. पोलिसांनी मराठीत बोलत अजितला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे पोटात आणि छातीमध्ये वेदना होत असल्याचे तो पोलिसांना सांगत होता. मात्र तरी मारहाण सुरूच होती. वेदना वाढल्याने पोलिसांनी त्याला दोन गोळ्या दिल्याचे यलप्पाने सांगितले. दरम्यान, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो अचानक कोसळला आणि कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यास ससून रूग्णालयात घेवून गेले तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. अजितचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा दाजी यलप्पाला पकडून ठेवले होते. शुक्रवारी पहाटे दोन वाजता बी. टी. कवडे रोड येथे त्याला सोडून देण्यात आले. अजितच्या पाठीवर तसेच शरिरावर मारहाणीच्या खुनाही दिसून आल्या. दरम्यान, पोलिसांनी यलप्पाच्या घोरपडीगाव येथील घराची झडती घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यल्लप्पा येल्लूर यांनी सांगितले.
नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
अजितच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वारगेट पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती. मारहाण करणा-या आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. मात्र, पोलीस तक्रार घेत नसल्याने त्यांनी वडार समाज संघटनांशी संपर्क साधला. संघटनेच्या पदाधिका-यांनी पोलीस आयुक्त कार्यालय, सीआयडी कार्यालयात धाव घेत अधिका-यांची भेट घेतली. मात्र, कोणीही दाद देत नसल्याने दिसून आले. शुक्रवारी सकाळपासून ससून रुगणालयातील शवागार तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर विविध संघटनांमार्फत ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये वडार समाजाचे पुणे शहराध्यक्ष संजय डोंगरे, यल्लप्पा येल्लूर, भाजपा युवा मोर्चा ए. एम. एस. सोशल फाउंडेशनचे सौरभ शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिक्रिया : पोलीस कोठडीत कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर तहसिलदाराच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात येतो. तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर मृत्यू का झाला हे स्पष्ट होईल.
रविंद्र रसाळ, प्रभारी सहायक आयुक्त, स्वारगेट विभाग