मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी युती होणारच, असे भाजपाचे नेते छातीठोकपण सांगत असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविण्यात आला आहे.पुणे येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, गेल्या वेळी आम्ही ४२ जागा जिंकल्या होत्या, या वेळी ४३ जागा जिंकू, असे विधान केले होते. त्याचा समाचार मुखपत्रातून घेण्यात आला आहे. एकीकडे ४३ जागा जिंकण्याची आरोळी ठोकायची आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती व्हायलाच पाहिजे, असे बोलायचे. एकदा नक्की काय ते ठरवा. चोवीस तास सत्तेच्या नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांच्यावर करण्यात आला आहे.भरकटल्यासारखे बोलल्याने लोकांमधील उरलीसुरली पत जाईल. ‘याला पाडू, त्याला पाडू’ असे सध्या त्यांचे सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वत:च कोसळतील, तरीही यांचा ‘गिरे तो भी टांग उपर’ या पद्धतीने कारभार सुरूच राहील, असा टोला मुखपत्रातून लगावण्यात आला आहे.मुखपत्रातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य करण्यात आल्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले गेल्याचे चित्र आहे.पालघरमुळे अडले युतीचे घोडे?भाजपा-शिवसेनेत अद्यापही युतीची बोलणी सुरू असली, तरी ती मुख्यत्वे पालघरच्या जागेवर अडली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर यापैकी पालघर आणि भिवंडी या दोन जागा भाजपाकडे आहेत. त्यातील पालघरची जागा देण्याची भाजपाची तयारी नाही. पालघरऐवजी माढा किंवा बारामतीची जागा शिवसेनेने घ्यावी, असा प्रस्ताव भाजपाने दिला आहे. शिवाय, काही उमेदवार बदल्यासंदर्भात दोन्ही पक्षांनी एकमेकांना सूचना केल्या असून, त्यावरूनही चर्चा अडली असल्याची माहिती आहे.
युतीचे काय ते ठरवा; तर्राट बोलणे बरे नाही, शिवसेनेचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 1:02 AM