मुंबई - विधानसभा निवडणुका तोंडावर असून, राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेला राधानगरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिले होते. मात्र या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसनेचे असल्याने त्यांनी राधानगरी मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे राहुल यांना उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे युतीच्या निर्णयावर आमदारपुत्र राहुल यांचे भवितव्य ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी राहूल यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र हा मतदारसंघ युतीच्या फॉम्युर्लानुसार शिवसेनेकडे आहे. त्यातच विद्यमान आमदार सुद्धा शिवसेनेचे असल्याने हा मतदारसंघ सेना सोडायला तयार नाही.
भाजप-शिवसेनेत युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर दुसरीकडे भाजप- सेना नेत्यांचे येत असलेल्या वक्तव्य पाहिले तर, ऐनवेळी युती तुटण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे युतीचा काय निर्णय होणार यावर राहुल देसाई यांचे भवितव्य ठरणार आहे. जर युती झाली नाही, तरच राहुल यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. मात्र असे असले तरीही, माजी आमदार बजरंग देसाई हे आपल्या चिरंजीव साठी ऐनवेळी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
बजरंग देसाई यांचा मतदारसंघात चांगले वजन आहे. १९८५ आणि १९९९ मध्ये ते राधानगरी मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे चंद्रकात पाटील यांनी त्यांचा मुलाला भाजपची उमेदवारीचे आश्वासन देऊन आपल्या पक्षात घेतले. त्यात हा मतदारसंघ आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीकडे गेला असल्याने तिथे उमेदवारी मिळण्याचे निश्चित नसल्याने बजरंग देसाई यांनी भाजपात जाने पसंद केले. मात्र आता त्यांना दिलेले आश्वासन चंद्रकात पाटील कसे पाळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.