मुंबई- नव्या कॅलेंडर वर्षात पहिला आणि महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. हा सण सगळे रुसवे फुगवे विसरून जाऊन, गुण्या गोविदाने राहायची शिकवण देणारा आहे. इतर सणा प्रमाणे मकर संक्रांतीला देखील एक वेगळे महत्व आहे आणि याला वैज्ञानिक आधार देखील आहे. मकरसंक्रांत हा हिंदूंचा महत्त्वाचा सण असून, दरवर्षी 14 जानेवारीला भारतीय लोक या सणानिमित्त मोठ्या थाटामाटात जल्लोष करतात. सूर्य ज्या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या तिथीला मकरसंक्रांत साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशीच सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असून, दिवस मोठा तर रात्री छोटी असते. असं म्हणतात, मकरसंक्रांतीच्या दिवशी ज्याचा मृत्यू होतो, त्याला पुनर्जन्म प्राप्त न होता तो थेट स्वर्गात प्रवेश करतो. मकर एक रास आहे आणि सूर्य एका राशि मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांती दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे या सणा ला मकर संक्रांती असे म्हणटले जाते. याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू बनवायची परंपरा आहे. भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा अशी मान्यता आहे.संक्रांती ही काय फक्त भारतातच साजरी नाही होत. ही आशिया खंडातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. पण हा सण मात्र एकच आहे. उत्तर प्रदेशमध्ये मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवरच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. तर महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. मकरसंक्रांत हा सण भोगी ( 13 जानेवारी), संक्रांत ( 14 जानेवारी) आणि किंक्रांत (15 जानेवारी) अशा तीन टप्प्यात साजरा केला जातो. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना 'तीळगूळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून शुभेच्छा दिल्या जातात. मकरसंक्रांत हा सण शांती आणि समृद्धीचं प्रतीक समजला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये लोक डुबकी मारून आंघोळ करतात. या पवित्र नद्यांमध्ये स्थान केल्यामुळे पापांचं नायनाट होतो, अशीही आख्यायिका सांगितली जाते.का उडवतात पतंग ?मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे. सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी आकाशात लाल, पिवळ्या, निळ्या रंगांची पतंग उडताना दिसतात.संक्रांतीच्या काळात वातावरण थंडं असतं. ऊनही फार कमी मिळतं, थंडीमुळे स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा रुक्ष होते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी हा खेळ खेळला जातो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली तर त्याचा शरीरराला फायदा होतो. त्वचेसाठी ही सूर्यकिरणे आवश्यक असतात, या किरणांमधून शरीराला आवश्यक व्हिटामीन डी मिळतं, आणि यासाठी हा खेळ खेळला जातो.
या कारणांमुळे मकरसंक्रांतीला उडवले जातात पतंग !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 3:34 PM