मुंबई : एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांना पाठविलेल्या अहवालात मुंबई-नेवार्क उड्डाणाला झालेला उशीर हा केवळ ‘प्रवाशाची गैरसोय’ मुळे झाल्याचे म्हटले आहे. उड्डाणाला कोणत्याही तांत्रिक कारणामुळे उशीर झालेला नसून फडणवीस यांनी आपल्या मुख्य सचिवांशिवाय प्रवास करायला नकार दिला होता. नागरी उड्डयन राज्यमंत्री महेश शर्मा हे उड्डाणाला झालेला उशीर हा तांत्रिक कारणांमुळेच असल्याचे बुधवार दुपारपर्यंत म्हणत होते. त्यांचे हे म्हणणे या अहवालाने खोडून काढले. शर्मा म्हणाले की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी व एअर इंडियाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. हा अहवाल एअर इंडियाचे उप व्यवस्थापक संतोष फर्नांडिस यांनी सादर केला होता. आपल्या संपूर्ण शिष्टमंडळाशिवाय उड्डाण करायला फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्याशिवाय अन्य कोणतेही कारण उशिरासाठी नव्हते, असे या अहवालात म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले होते की, एक तर ते त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळासह प्रवास करतील किंवा स्वत:सह इतर सगळे विमानातून खाली उतरतील. या अहवालात कोणत्याही तांत्रिक दोषाचा किंवा एटीसीशी संबंधित गोष्टींचा उल्लेख नाही. उशिराने झालेले उड्डाण हे केवळ ‘प्रवाशाची गैरसोय’ एवढ्या एकाच कारणाने झाले, असे त्यात म्हटले आहे.एअरलाईन्सने दोन वेगवेगळ््या विमानांतून त्यांच्या बॅगा खाली काढण्याचे काम सुरू करताच (हे काम खूप वेळ खाणारे असते) कोणीतरी परदेशी यांच्या घरून त्यांचा पासपोर्ट घेऊन तेथे आले. बॅगा, सामान खाली काढून घेऊन नवे सामान चढविण्यामुळे उड्डाणाला आणखी उशीर होणार होता त्यामुळे परदेशी यांना विमानात बसू देऊन मग उड्डाण करण्याचा निर्णय घेतला.विमानाचे उड्डाण २.३० वाजता होताच ड्युटीवरील व्यवस्थापकाने काही मिनिटांतच आपला अहवाल एअरलाईनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन, कार्यकारी संचालक (उत्तर व पश्चिम) आणि इंटरनॅशनल आॅपरेशन्स कंट्रोल सेलला पाठविला. परदेशी डेट्रॉईट येथून बुधवारी बोलताना, उशीर माझ्यामुळे झाला हे मान्यच करायला तयार नव्हते. मी २० मिनिटे उशिरा पोहोचलो. मी विमानातून उतरलोही. परंतु विमानाला उड्डाणाची परवानगी नव्हती. मला मग विमानात बसण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर विमानाने ४५ मिनिटांनी उड्डाण केले, असे परदेशी म्हणाले. (प्रतिनिधी)
उड्डाणाच्या विलंबाला परदेशीच जबाबदार
By admin | Published: July 03, 2015 2:57 AM