अंगणवाडीतील मुलांना निकृष्ट दर्ज्याची साखर; संबंधितांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 09:43 PM2021-06-02T21:43:26+5:302021-06-02T21:45:42+5:30
कोरोना कालावधीत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामधील साखर निकृष्ठ दर्जाची असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कसारा: कोरोना कालावधीत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामधील साखर निकृष्ठ दर्जाची असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पाटीलवाडी येथील लाभार्थी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली साखर तांबूसरंगाची असल्याचे निदर्शनास आले आहे. तब्बल ३१ लाभार्थ्यांना तांबुसरंगाच्या निकृष्ठ साखरेचे पॅकेट मिळाले असून यामुळे पुरवठादारकडून पुरवठा केला जाणाऱ्या धान्याच्या तपासणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बेफिकीरीमुळे बालकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकाराबाबत पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांसह अंगणवाड्याही बंद ठेवण्यात आल्या असल्याने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून घरपोच आहार देण्यात येत आहे. यामध्ये गरोदर व स्तनदा मातांसह सहा महिने ते सहा वर्षाच्या विद्यार्थ्यांना गहू, चवळी, मीठ, मसूर, साखर, हळद पावडर, मिरची पावडर पॅकिंग स्वरूपात देण्यात येते. दि. महाराष्ट्र स्टेट को ऑप कंजूमर्स फेडरेशन लि. मुंबई यांच्याकडून या धान्याचा पुरवठा करण्यात येत असलेल्या या धान्यामधील साखर निकृष्ठ दर्जाची असल्याचे शहापुरात समोर आल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून याबाबत तक्रार करण्यात आली आहे. एक जून रोजी कसारा पाटीलवाडी येथील अंगणवाडी केंद्रातील जय गणेश ठाकरे या पाच वर्षीय विद्यार्थ्याला वाटप करण्यात आलेल्या साहित्यामधील साखरेच्या पॅकेटवर २५ मे २०२१ ची पॅकिंग असून त्याची मुदत सहा महिन्यापर्यंत आहे. या पॅकेटमध्ये असलेली तांबुसरंगाची साखर खाण्यास अयोग्य असून त्यामुळे विषबाधा होऊन जीवितास धोका होण्याची शक्यता असल्याबाबत तक्रारदार प्रकाश खोडका यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
तालुक्यातील शहापूर व डोळखांब प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बहुतांशी अंगणवाड्यांमध्ये निकृष्ठदर्जाची साखर वाटप केल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप करीत बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित पुरवठादार व अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून यापुढे बालकांच्या जीवाशी खेळल्यास आंदोलन करण्याचा इशाराही गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे आहाराचे वाटप करताना मालाचा उत्पादन दिनांक तसेच माल वापरत असल्याचा कालावधी तपासणे व पुरावठा करणे, धान्य वजनकाट्यावर मोजून घेणे यासह यासंदर्भातील महत्वपूर्ण बाबींची पडताळणी केली जाते की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, डोळखांब प्रकल्पाचे अधिकारी सतीश पोळ यांनी कसारा पाटीलवाडी येथे धाव घेऊन तेथील ३१ लाभार्थी विद्यार्थ्यांचे साखरेचे पॅकेट ताब्यात घेतले आहेत. या साखरेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे सांगून या लाभार्थ्यांना साखर बदलून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान अंगणवाडी मद्ये वाटप होणाऱ्या पोषण आहार वाटपात संबंधित ठेकेदारकडून व अधिकाऱ्याकडून निष्काळजी पणा केला जात असुन बेजबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. - प्रकाश खोडका. तक्रारदार.
सदर ची साखर पॅक ताब्यात घेतले असुन त्या साखरेचे नमुने तपासणी साठी कार्यशाळेत पाठवण्यात आले आहेत सदर चे रिपोर्ट आल्यावर पुढील कार्यवाही जरूर करू. - सतिश पोळ. प्रकल्प अधिकारी, डोळखांब.