मुंबई : प्रेमप्रकरणानंतर लग्नास नकार देणा-या प्रियकरावर थेट बलात्काराचा आरोप आणि गुन्हा नोंदविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. अशा प्रकरणात गुन्हा नोंदविण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी राज्य सरकार आणि पोलिसांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका प्रेमी युगुलानेच ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेतील मुलीने विवाहास नकार दिला म्हणून मुलाविरुद्ध बलात्काराचा आरोप केला होता. पोलिसांनी तसा गुन्हाही नोंदविला. मात्र, हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचल्यानंतर मुलीने बलात्काराचा आरोप मागे घेतल्याने न्यायालयानेही मुलावरील गुन्हा रद्द केला. मुलीच्या म्हणण्यानुसार , पोलिसांनी यासंदर्भात मुलावर चुकीचा आरोप ठेवला असून पोलिसांनी मराठीत जबाब नोंदविल्याने तिला यातील काहीच कळले नाही. अॅड, महेश वासवानी यांनी त्याबाबत बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने एफआरआर रद्द करण्याचा आदेश दिला होता.त्यामुळे यापुढे प्रेमप्रकरणातून उद्भवणारे गुन्हे नोंदविताने ते पीडीतेला समजेल अशा भाषेत जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच अशा तक्रारींची दखल घेण्यासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे आखावीत. जेणेकरुन कायद्याचा गैरवापर करुन एखाद्या मुलावर बलात्कारासारखा गंभीर नोंदला जाणार नाही. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजीत जबाब नोंदविण्याची परवानगी द्यावी तसेच प्रेमप्रकरणातील गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आखण्याबाबत राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. अॅड. महेश वासवानी यांच्यासह अॅड. स्वप्ना कोडे, अॅड. धारिणी नागदा, अॅड.मानसी महांता आणि अॅड. अमला साळवी यांनी याबाबत याचिकाकर्तीची बाजू मांडली. (प्रतिनिधी)
बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी
By admin | Published: December 29, 2016 1:33 AM