मुंबई- भारतीय जनता पार्टीच्या ट्विटर हँडलवरून कोणतेही ट्विट केले नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्विट प्रसिद्ध होण्याचा रविवारचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा ते हॅक तर झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते व प्रदेश माध्यम विभाग प्रमुखांनी केली आहे. पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे रविवारी एका तक्रारीतून त्यांनी ही मागणी केली आहे.गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत हीन दर्जाचा प्रचार विरोधकांकडून होत असताना यात कुठे छेडछाड तर झाली नाही ना, असा संशय आहे. भाजपाच्या ट्विटर हँडलचा दुरुपयोग करण्यात आला असून ते हॅक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार भाजपानं सायबर विभागाकडे केली आहे. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भाजपा महाराष्ट्रचे @BJP4Maharashtra हे अधिकृत ट्विटर हँडल आहे. भाजपाचे प्रदेश सोशल मीडिया संयोजक आशिष मेरखेड हे हँडल वापरतात. रविवार, ३ नोव्हेंबर रोजी मेरखेड अथवा अन्य कोणी पक्षाच्या वतीने अधिकृतपणे काहीही ट्विट केले नसताना सकाळी सव्वादहा वाजता भाजपाच्या सरकारसंदर्भात आक्षेप घेणारे ट्विट प्रसिद्ध झाले. भाजपाचे ट्विटर हँडल हॅक झाल्याची शक्यता दिसत असून, या प्रकाराची चौकशी करावी.
भाजपाच्या ट्विटर हँडलच्या दुरुपयोगाची पोलिसांमार्फत चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 6:08 PM