मुंबई - महायुती सरकारचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असेल हे आता जवळपास निश्चित झालं असून एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनणार, एकनाथ शिंदे केंद्राच्या राजकारणात जाणार की शिंदे पक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेत संघटना वाढीसाठी काम करणार अशा विविध चर्चा सुरू आहेत. त्यात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचं राजकारण सोडून दिल्लीत जाणार नाहीत असं स्पष्टपणे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, अद्याप मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर झाले नाही. एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाही. त्यांनी कॉमन मॅन म्हणून राज्यात जी प्रतिमा निर्माण केली ते सोडून ते दिल्लीत जाणार नाहीत. उपमुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय असेल तो संध्याकाळपर्यंत ठरेल. आजच्या घडीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण हे स्पष्ट नाही. दिल्लीतल्या बैठकीतलं स्पष्टीकरण अद्याप पुढे आले नाही. शिवसेनेचा वाटा महायुतीच्या विजयात मोठा आहे. गृहखाते आमच्याकडे असले पाहिजे अशी मागणी असेल तर ते महत्त्वाचे आहे. राज्यात जातीय संघर्ष, दंगली हे हाताळण्यासाठी कसब लावावी लागेल. त्यामुळे हा कारभार आम्हाला चांगल्यारितीने सांभाळायचा आहे. एकनाथ शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस आहे. दिल्लीच्या राजकारणात गेले तर इथे लक्ष देता येणार नाही. त्यामुळे ते इथेच राहतील असं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे काही निर्णय घेतील त्याचा अंदाज नाही. कदाचित ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाहीत किंवा स्वीकारतीलही अथवा पक्षाचे प्रमुख म्हणून काम करतील. कुठलाही निर्णय ते घेऊ शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचा अंदाज बांधता येत नाही. २ उपमुख्यमंत्री फॉर्म्युला असेल तर एकनाथ शिंदे यांनी पद स्वीकारले नाही तर दुसऱ्याला कुणाला मिळू शकते. आमचा मुख्यमंत्रिपदावरील दावा संपलेला नाही. सरकार स्थापनेस कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी शिंदेंनी विधान केले. भाजपाचा मुख्यमंत्री नसेल तर महायुतीचा मुख्यमंत्री कुणीही झालं तरी आम्हाला आनंद आहे असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.
दरम्यान, महायुतीत कुणाचे अडथळे नाहीत. माझ्यामुळे कुणाला अडथळा नको, जो काही निर्णय असेल तो मान्य करू असं एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली आहे. आमच्याकडे ५७ आमदार असून काही अपक्ष सोबतीला आलेत. त्यामुळे संख्याबळही वाढले आहे. आम्ही जे निवडून आलोय त्यात सिंहाचा वाटा एकनाथ शिंदेंचा आहे. भाजपा, राष्ट्रवादी उमेदवार असेल त्यांच्याही विजयात एकनाथ शिंदेंनी काम केले आहे. पक्ष न पाहता महायुतीच्या उमेदवारासाठी ते काम करत होते, म्हणून एकनाथ शिंदे यांचे आज वजन आहे. महायुतीसाठी एकनाथ शिंदे लढले हे महाराष्ट्रासमोर चित्र आहे असं संजय शिरसाट यांनी सांगितले.