विकास आराखड्यात फेरबदल

By admin | Published: April 3, 2017 02:01 AM2017-04-03T02:01:07+5:302017-04-03T02:01:07+5:30

ताथवडेगावच्या प्रारूप विकास योजनेस अंतिम मंजुरी देताना राज्य सरकारने विकास आराखड्यातील काही भाग वगळला आहे

Development Plan Shuffle | विकास आराखड्यात फेरबदल

विकास आराखड्यात फेरबदल

Next


पिंपरी : ताथवडेगावच्या प्रारूप विकास योजनेस अंतिम मंजुरी देताना राज्य सरकारने विकास आराखड्यातील काही भाग वगळला आहे. विकास योजनेतील फेरबदल दर्शविणारे नकाशे राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत. हे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यावर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास ३० दिवसांच्या मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील सामाजिक, मूलभूत सुविधांच्या वापरासाठी एकूण ९३७ पैकी ८५० आरक्षणे कायम ठेवली आहेत. सरकारी जागांवरील ८७ आरक्षणे उठविण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने डीपी मंजूर करताना १० टक्क्यांपेक्षा जास्त बदल केले आहेत.
महापालिका हद्दीतील ताथवडे गावच्या प्रारूप विकास योजनेस महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये अंतिम मंजुरी देताना राज्य सरकारने क्रमांक १ ते २८ हा भाग मंजुरीतून वगळला. या नियोजित फेरबदलासंदर्भात ६ जानेवारी २०१७ रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. या फेरबदलासंदर्भात नागरिकांकडून मुदतीत प्राप्त होणाऱ्या हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्यासाठी पुणे विभाग नगररचना सहसंचालक अविनाश पाटील यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)
>सूचना आणि हरकतींसाठी महिन्यांची मुदत
ताथवडे गावच्या प्रारूप विकास योजनेतील फेरबदल दर्शविणारे नकाशे राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत. ते नागरिकांसाठी ३० मार्चपासून पुणे विभाग नगररचना कार्यालयात, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर, तसेच महापालिकेच्या विकास योजना विभागात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी ३० दिवसांच्या मुदतीत हरकती किंवा सूचना सादर कराव्यात, असे आवाहन केले आहे.

Web Title: Development Plan Shuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.