मुंबई : रायगड किल्ल्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्हाधिकारीस्तरावर वर्गही करण्यात आले आहेत. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून या किल्ल्याचा सर्वांगिण विकास करु, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सदस्य जयंत पाटील यांनी यासंदर्भात विचारलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रश्नावर झालेल्या चर्चेत पाटील यांच्यासह आमदार भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
रावल म्हणाले की, रायगड किल्ला हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. देश – विदेशातील पर्यटकांना येथे आकर्षिक करणे आणि त्यामार्फत छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने या किल्ल्याचा सर्वांगिण विकास करण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने ३१ मार्च २०१७ रोजी या किल्ल्याच्या विकासासाठी ६०६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यातून किल्ला आणि परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पाथ – वे, लाईट आणि साउंड शो यांसारखी अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. मागील साधारण एक वर्षात केंद्रीय पुरातत्व खात्यानेही विविध परवानग्या दिल्या असून विकासकामांचा ६० कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्हाधिकाऱ्यांना वर्गही करण्यात आला आहे. रायगडच्या विकासासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली एक प्राधिकरणही स्थापन करण्यात आले आहे. तसेच या कामांसाठी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांच्यामार्फत रायगड किल्ल्याच्या विविध विकास कामांना गती देण्यात येईल, असे ते म्हणाले.