Devendra Fadnavis Reaction mahayuti victory, vidhan sabha assembly election result 2024: राज्यात महायुतीने प्रचंड बहुमताकडे वाटचाल केलेली आहे. महाविकास आघाडीची एवढी धुळधाण उडाली की विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही मिळणे कठीण होऊन बसले आहे. मतमोजणीच्या पहिल्या चार तासांतच २८८ जागांचे कल हाती आले. त्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने २०० पार मजल मारल्याचे चित्र दिसून आले. दुपारी २ वाजताच्या सुमारास महायुतीला २२७ तर मविआला ५३ तर इतर आमदारांना ८ जागा असा कल मिळाला. महायुतीच्या या जोरदार मुसंडीनंतर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करून प्रतिक्रिया दिली.
विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारसभा सुरु झाल्या तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतली आणि एक है तो सेफ है अशी घोषणा दिली. ही घोषणा नंतर पूर्ण प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली. निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावर भाजपा आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. पण निवडणुकीच्या निकालात महायुतीला तुफान यश मिळाले. त्यामुळे हाच धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले. "एक है तो ‘सेफ’ है!मोदी है तो मुमकिन हैं!" अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
त्याआधी काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी एक इन्स्टाग्राम पोस्टही केली होती. त्यात त्यांनी हर संत कहे, साधू कहे... सच और साहस है जिसके मन में, अंत में जीत उसी की रहे। असे संतवचन लिहिले होते. त्यावर समर्थकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला होता. आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला होता.