६ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा
By admin | Published: October 29, 2014 08:48 PM2014-10-29T20:48:16+5:302014-10-29T20:50:49+5:30
४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचे अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केलेली असतानाच शपथविधीच्या चार दिवसानंतर देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचे अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
२८८ आमदार असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत १४४ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२२ जागांवर विजय मिळालेला आहे. तर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रासपला एका जागेवर विजय मिळाला आहे. यानुसार भाजपाचे सध्याचे संख्याबळ १२३ आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचे जाहीर करत विश्वासदर्शक ठरावाच्या अनुपस्थित राहू असे स्पष्ट केले. भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट केलेले नाही.
दुसरीकडे शिवसेना व भाजपामध्ये चर्चेचे गु-हाळ अजूनही सुरुच आहे. युतीसाठी या दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. भाजपाला पाठिंबा देणार की नाही याचा निर्णय उद्यापर्यंत जाहीर करु असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. शपथविधी सोहळ्यानंतरच शिवसेनेला सोबत घ्यायची की नाही यावर निर्णय घेऊ असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. ६ नोव्हेंबररोजी विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्यामुळे विधीमंडळातील विश्वासदर्शक ठरावात उत्तीर्ण होण्यासाठी भाजपाला अथक मेहनत घ्यावी लागेल असे दिसते.