"दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:47 PM2020-05-19T15:47:51+5:302020-05-19T15:54:07+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर लिहिलेल्या पुस्तकात दावा
मुंबई: शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी धुडकावून अजित पवारांसोबत सकाळी लवकर शपथविधी उरकण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मिरची हवन केलं होतं, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावं. त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींवर आधारित 'चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र' या पुस्तकात फडणवीसांनी केलेल्या मिरची हवनचा उल्लेख आहे.
सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या 'चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र' पुस्तक डिजिटल स्वरुपात प्रकाशित झालं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. बहुमताचा आकडा गाठलेल्या शिवसेना-भाजपामध्ये सत्तावाटपावरून निर्माण झालेला दुरावा, शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी, त्याला भाजपाचा असलेला विरोध यावरून महाविकास आघाडीची समीकरणं जुळली. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं राज्यातल्या जनतेला वाटू लागलं. मात्र २३ नोव्हेंबरच्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत शपथविधी आटोपला. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सूत्रं हाती घेत सगळी चक्रं फिरवली. त्यामुळे अजित पवारांचं बंड फसलं.
राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाची पार्श्वभूमी, अजित पवारांचं बंड, त्यांची घरवापसी, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना दाखवण्यात आलेली आमिषं, या खेळातलं पडद्यामागचे खेळाडू, पवारांनी हलवलेली सूत्रं, या सगळ्या घडामोडींवर सूर्यवंशी यांनी पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी 'मिरची हवन' केल्याचा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातल्या नालखेडा येथील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हवन करून घेतलं होतं. उत्तराखंडमधलं हरीश रावत सरकार या 'मिरची हवन'मुळं वाचल्याचं फडणवीसांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे फडणवीसांनी हे हवन केलं होतं. मिरची हवन करणाऱ्या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच शपथविधीच्या वेळी फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या निळ्या रंगाच्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं, असाही दावा पुस्तकात करण्यात आला आहे.
कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागी
मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला
उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...