मुंबई : देशभरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे. तसेच, महाशिवरात्रीनिमित्त उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली आहे. तसेच, यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी सकाळी कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित भव्य आणि दिव्य अशा कुंभमेळ्यातील स्वच्छतेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.
गेल्या 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांनीही त्रिवेणी संगमावर जाऊन गंगेत स्नान केले होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान करणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1954 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमावर स्नान केले होते.
दरम्यान, महाशिवरात्री'निमित्त देशासह महाराष्ट्रात सर्वच भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील भिमाशंकर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, परळीचे वैजिनाथ, परभणीचे औंढ नागनाथ आणि औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त यात्राही भरल्या जातात. महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.