उदयनराजे हे राजे आहेत; विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुखांचं 'रोखठोक' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 04:36 PM2020-01-17T16:36:38+5:302020-01-17T16:39:17+5:30
संजय राऊत आणि उदयनराजे या दोघांपैकी नेमका धीर कोणी धरावा?
अहमदनगर: संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांना मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी कार्यक्रमाच्या रॅपिड फायर प्रश्नोत्तरात सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे, अमित देशमुख की रितेश देशमुख असा प्रश्न विचारल्यावर धीरज देशमुख यांनी रितेश देशमुख यांच्यावर सर्वात जास्त प्रेम असल्याचे सांगितले.
सर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर
धीरज देशमुख यांना रॅपिड फायर प्रश्नोत्तरात आगामी काळात मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, रोहित पवार की आदित्य ठाकरे असा प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्राने ठरवायचं आहे असे उत्तर दिले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी साताऱ्याचे भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्याने गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. संजय राऊत यांच्या या विधानाचा निषेध म्हणून गुरुवारी सातारा बंद ठेवण्यात आला होता. तसेच आज शिवप्रतिष्ठानने देखील सांगली बंदची हाक दिली होती. त्यामुळे संजय राऊत आणि उदयनराजे या दोघांपैकी नेमका धीर कोणी धरावा असा प्रश्न देखील अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुख यांना मुलाखतीत विचारला. यावर धीरज देशमुख यांनी उदयनराजे हे राजे असून ते श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी धीर धरावा असं म्हणत धीरज देशमुखांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
...तर जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही; शरद पवारांनी रोहितला दिला होता सल्ला
लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात राऊत यांनी उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला होता. उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत. भाजपाचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते तेव्हा आम्ही नतमस्तक होतो, असेही राऊत यांनी सांगितले होते. गणपती, विष्णू अशा दैवतांची पूजा करताना कुणी विचारायला जात नाही. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील. तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे.असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले होते.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'' या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला टीकेचे अधिक लक्ष्य केले. ते म्हणाले की,'' मुंबईला असलेल्या शिवसेना भवनात बाळासाहेबांच्या फोटोखाली शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. यावर शिवसेनेने उत्तर दिले पाहिजे. शिवरायांचे वंशज म्हणून आमच्यावर टीका केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही. पण सोयीप्रमाणे राजकारण करायचं ही काही जणांची लायकी आहे. शिवसेनेकडून शिववडा नावाचा वडापाव सुरू करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. खरंतर शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना केले पाहिजे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला होता.