सॅटेलाइट राॅकेट बूस्टरचे भाग भारतात पडले की पाडले? आकाशातून अग्निगाेळे पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम : तज्ज्ञांचे दावे, प्रतिदावे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:06 AM2022-04-04T09:06:28+5:302022-04-04T09:06:59+5:30
Nagpur News: शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या विविध भागात अग्निवर्षाव किंवा लाल रंगाच्या वस्तू पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम आहे. हे पार्ट न्यूझीलंडद्वारे अवकाशात साेडलेल्या उपग्रहाच्या राॅकेट बूस्टरचे असल्याचा दावा केला जात आहे.
- निशांत वानखेडे
नागपूर - शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या विविध भागात अग्निवर्षाव किंवा लाल रंगाच्या वस्तू पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम आहे. हे पार्ट न्यूझीलंडद्वारे अवकाशात साेडलेल्या उपग्रहाच्या राॅकेट बूस्टरचे असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे अंतराळात सैरभैर फिरत असलेल्या उपग्रहांचे तुकडे असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. उपग्रहाचे तुकडे आहेत की विदेशी देशांनी भारताला लक्ष्य करण्यासाठी केलेली कूटमोहीम, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, जालना आदी जिल्ह्यात शनिवारी रात्री आठच्या सुमारास आकाशातून अग्निवर्षाव हाेताना अनेकांनी पाहिले. त्यावेळी हा उल्कावर्षाव असल्याचा अनेकांचा समज झाला. मात्र लाल रंगाच्या तप्त वस्तू पडल्याची माहिती समाेर आल्याने त्याचे गूढ वाढले. चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाहीच्या लाडबाेरीत रात्री ७.४५ वाजता एक लाल रंगाची वस्तू पडल्याचे अनेकांनी पाहिले. ही धातूची रिंग हाेती. सध्या ती स्थानिक पाेलीस स्टेशनला जमा आहे. तर रविवारी वर्धा जिल्ह्यातील वाघाेडा येथे आकाशातून पडलेल्या धातूचा गाेळा आढळून आला. त्यामुळे हा उल्कावर्षाव नसून मानवी उपग्रह किंवा राॅकेटचे भाग असण्याच्या दाव्याला दुजाेरा मिळाला आहे.
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरून राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे ब्लॅकस्काय उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या ‘इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बूस्टर’चेच भाग असावेत, असा दावा एमजीएम अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला. दुसरीकडे अंतराळात भटकत असलेल्या जुन्या उपग्रहाचे तुकडे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येऊन खाली काेसळल्याचा अंदाज खगाेल अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी व्यक्त केला.
काय असताे राॅकेट बूस्टर
काेणताही उपग्रह अंतराळात साेडताना मल्टिस्टेज प्रक्रिया अवलंबली जाते. लाॅन्चिंग स्टेशन समुद्रकाठावर असते कारण एखादी दुर्घटना घडली तर त्याचे अवशेष समुद्रात पडावे. पहिल्या स्टेजमध्ये राॅकेट बूस्टर उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विराेधात बाहेर नेऊन कक्षेत स्थापन करताे आणि मुख्य युनिटपासून वेगळा हाेताे. या प्रकारात ताे भारतावरच्या मार्गाने निघाला आणि उपग्रहाला कक्षेत स्थापन करून पुन्हा गुरुत्वाकर्षणाने इकडे पडला असल्याची शक्यता रामन विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी व्यक्त केली.
...तो तर चीनच्या उपग्रहाचा तुटलेला भाग
पुणे : विदर्भ व मराठवाड्यात आकाशातून कोसळलेला भाग धातूची तबकडी किंवा उल्कापात नाही, तर चीनमधील उपग्रहाचा कोसळलेला भाग असल्याचे खगोलशास्त्र अभ्यासकांनी सांगितले. मुंबई येथील नेहरू तारांगण संस्थेचे संचालक अरविंद परांजपे म्हणाले, महाराष्ट्रात काही भागांत चीनने आकाशात सोडलेल्या उपग्रहाचे तुकडे पडले आहेत. उपग्रहाचा काही भाग कोसळल्यानंतर त्याची दिशा भरकटली. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर त्याचा वातावरणातील घटकांशी संपर्क आला. उपग्रहाच्या तुकड्याचे तापमान वाढल्याने त्याने पेट घेतला. उर्वरित अवशेष जमिनीवर कोसळले आहेत.
खगोलशास्त्राचे अभ्यासक प्रकाश तुपे म्हणाले, महाराष्ट्रात काही ठिकाणी पडलेले धातूचे तुकडे म्हणजे चीनने आकाशात पाठवलेल्या उपग्रहाच्या तिसऱ्या टप्प्यातील रॉकेटचे तुकडे आहेत. या उल्का किंवा उपग्रहाचा भाग नाही. ते रॉकेटचे तुकडे असून जमिनीवर आकाशातून हळूहळू आले आहेत. त्यामुळे ते सुमारे तीन ते पाच मिनिटे दिसून आले. चीनच्या उपग्रहाच्या तिसऱ्या टप्प्यातील रॉकेटचा काही भाग गुजरात, मराठवाडा व विदर्भ या परिसरात कोसळणार होता, असे चीनच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.