नंदूरबार – देशात प्रवासी वाहतुकीचं सर्वात स्वस्त आणि सुलभ माध्यम म्हणजे भारतीय रेल्वे. देशातील कानाकोपऱ्यात रेल्वे पोहचली आहे. त्यामुळे हवं असलेले ठिकाण गाठण्यासाठी प्रत्येकाचा हमखास रेल्वे प्रवास होतो. मात्र तान्ह्याबाळासह रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. लांबचा प्रवास असला तर या महिलेची दमछाक होते. याच अडचणीतून महिलांची सुटका करण्यासाठी नंदूरबारच्या एका युवकानं बाळांच्या सोयीसाठी भन्नाट संशोधन केले आहे.
रेल्वेतील सध्याच्या लोवर बर्थमध्ये आई व बाळ दोघांना झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. त्यामुळे छोट्याशा जागेत अडखळत झोपावे लागते. तोकड्या जागेत आईसह बाळाला झोपता येत नसल्याने ते दोघांच्या आरोग्यासाठी हानिकरक आहे. अशावेळी फोल्डेबल बेबी बर्थ हा उपाय ठरु शकतो. श्रॉफ हायस्कूल व कॉलेजच्या प्राध्यापक नितीन देवरे आणि त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी याचा शोध लावला आहे.
फोल्डेबल बेथी बर्थ हा ७६ सेमी बाय २३ सेमी साईजचा असून जवळपास १० ते १२ किलो वजन पेलू शकतो. यामध्ये बाळ झोपेत खाली पडू नये यासाठी विशेष सोय केलेली आहे. या बर्थची रचना बाळाला दुखापत होणार नाही अशी बनवण्यात आली आहे. कमी वजनाच्या मजबूत आणि टाकाऊ वस्तूंचा यासाठी वापर करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लोवर बर्थला हा फोल्डेबल बेबी बर्थ जोडला तर बाळ यावर निवांत झोपू शकतं आणि आईलाही झोपण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध होते. आवश्यक नसल्यास बेबी बर्थ लोवर बर्थच्या खाली फोल्ड करता येतो. ज्यामुळे बसून प्रवास करणाऱ्या स्थितीतही बेबी बर्थ अडथळा ठरत नाही. या फोल्डेबल बर्थमध्ये प्रौध व्यक्तींना औषधं आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो. देवरे जोडप्याने लावलेल्या या शोधाला नुकतेच इंडियन पेटंट म्हणून मान्यता मिळाली आहे
काय आहे वैशिष्टे?
सध्या अस्तित्वात असलेल्या लोवर बर्थमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही
झोपेत बाळ खाली पडू नये यासाठी संरक्षक सीट बेल्टची सोय
रेल्वे कोचमध्ये इतरांना अडथळा होणार नाही अशाप्रकारे बर्थची सोय
पँसेजर विशेषत: महिलांना हाताळण्यास सोपी रचना
मजबूत आणि जास्त काळ टिकणारी जोडणी
बर्थ हाताळताना विजेच्या वापराची गरज नाही
याबाबत नितीन देवरे म्हणाले की, रेल्वेतील सध्या परिस्थितीत लोवर बर्थचा विचार करुन फोल्डेबल बेबी बर्थ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण भारतीय रेल्वेने आपल्या पद्धतीने सुधारणा करुन बेबी बर्थ प्रत्यक्षपणे अस्तित्वात आणावा हीच अपेक्षा आहे. समाजाचा एक घटक म्हणून हे संशोधन भारतीय रेल्वेला विनामूल्य हस्तांतरित करण्यास तयार आहोत असं त्यांनी सांगितले. तर बाळ आणि आई दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने फोल्डेबल बेबी बर्थ महत्त्वाचा ठरेल. बाळासोबत असलेल्या महिलांचा विचार करता एका बोगीमध्ये किमान एक फोल्डेबल बर्थ असावा असं हर्षाली देवरे यांनी म्हटलं.