पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सुब्रतो मुखर्जी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात दिघी येथील आर्मी पब्लिक स्कूल आणि मोरवाडी येथील एसएस अजमेरा स्कूलने अंतिम फेरीत प्रवेश केला.मासूळकर कॉलनी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुलात स्पर्धा सुरू आहे. सोमवारी पहिल्या उपांत्य लढतीत दिघीच्या आर्मी पब्लिक स्कूलने देहूरोडच्या आर्मी स्कूलचा टायब्रेकरमध्ये ४-३ असा पराभव केला. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली होती. टायब्रेकरमध्ये दिघीकडून दिनेश सिंग, फहिम खान, प्रतीक चांदे आणि सुमित कांबळे यांनी गोल केले. देहूरोडकडून मृण्मय हिरकणे, आजस कटापूरकर आणि आर्यन सलग्रोता यांना गोल करण्यात यश मिळाले. पहिला उपांत्य सामना रंगतदार झाला. मात्र, तुलनेने दुसऱ्या उपांत्य सामन्यात फारसा आक्रमक खेळ दिसला नाही. एसएस अजमेराने निगडीच्या अमृता विद्यालयम्चा १-० असा निसटता पराभव केला. त्यांच्या साहिल आगाने विजयी गोल नोंदविला.१७ वर्षांखालील गटात पिंपरीच्या जीजी इंटरनॅशनल स्कूलने आकुर्डीच्या सरस्वती विश्व विद्यालयावर देवांश सिरोहीच्या गोलाच्या बळावर १-०ने मात केली. भोसरीच्या प्रियदर्शनी स्कूलने निगडीच्या क्रिएटिव्ह स्कूलला १-० असेच नमविले. त्यांचा विजयी गोल आकाश सावंतने केला. न्यू मिलेनियमने अभिषेक विद्यालयावर गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये ४-२ अशी सरशी साधली. त्यांच्या प्रसाद कुणाल, वैशव शिंदे, आदित्य रहातवान य स्टॅलोन नायगम यांनी गोल केले. अभिषेक विद्यालयाकडून रोहन पाटील आणि चेतन शाही यांना गोल करण्यात यश मिळाले. (प्रतिनिधी)>१७ वर्षांखालील गटात निगडीच्या अभिमान इंग्लिश स्कूलने एसएस अजमेरा, चिंचवडचा १-० असा पराभव केला. एकमेव गोल साहिल दळवीने केला. चिंचवडच्या सेंट अॅण्ड्र्यूजने देहूरोडच्या सेंट ज्यूडचा टायब्रेकरमध्ये ४-२ असा पराभव केला. गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये सेंट अॅण्ड्र्यूजकडून रोहित शर्मा, अनिष वाघमारे, आशुतोष जोरखडे, रोनाल्ड जॉन यांनी आणि सेंट ज्यूडकडून रिहान मणियार व महेश परोदलू यांनी गोल केले.
दिघी आर्मी स्कूल, अजमेरा अंतिम फेरीत
By admin | Published: August 02, 2016 1:55 AM