ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ११ - राज्यभरात दारूबंदीसाठी चळवळ सुरू असतानाच सत्ताधा-यांनीच बिअर बारचे उद्घाटन केल्याने खळबळ माजली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी रात्री नगरमध्ये चक्क एका बिअर बारचे उद्घाटन केले. शिंदे यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. सुधीर तांबेंसह अनेक राजकीय नेते या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यात व राज्यात सध्या दारूबंदी चळवळ सुरू असतानाच गृहराज्यमंत्र्यांनीच बारचे उद्घाटन केल्यानंतर समाजासमोर कोणता आदर्श ठेवला जाईल असा सवाल विचारण्यात येत असून हे वर्तन नैतिकतेला शोभणारे नसल्याचीही चर्चा होत आहे. सत्ताधारी भाजपाच्याच एका मंत्र्यांने बिअर बारचे उद्घाटन केल्यावर मुख्यमंत्री आता त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडेही सर्वांचे लक्ष असून विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.