दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम; महाडीबीटी योजनेंतर्गत अनुदान जमा करण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 05:36 AM2021-04-18T05:36:07+5:302021-04-18T05:36:21+5:30
राज्यातील विविध जिल्ह्यांत लाभार्थी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत यावर्षी महाडीबीटी योजना राबविण्यात येत आहे.
संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कृषी विभागामार्फत यावर्षी प्रथमच राबवण्यात येत असलेल्या महाडीबीटी योजनेंतर्गत राज्यातील २ लाख २ हजार २३६ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्याची प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे.
त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत लाभार्थी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत यावर्षी महाडीबीटी योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे आणि ठिबक, तुषार संच व इतर सिंचन सुविधांच्या अनुदानासाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून ‘महाडीबीटी’ पोर्टलव्दारे अर्ज करण्यात आले होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी राज्यातील २ लाख २ हजार २३६ लाभार्थी शेतकऱ्यांची लाॅटरी पध्दतीने गत फेब्रुवारीमध्ये निवड करण्यात आली. त्यामध्ये ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे अनुदानासाठी २९ हजार ३९ आणि ठिबक, तुषार व इतर सिंचन सुविधा साहित्याच्या अनुदानासाठी १ लाख ७३ हजार १९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया
nमहाडीबीटी योजनेत निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेतल्यानंतर योजनेंतर्गत मंजूर साहित्याची खरेदी करणे आवश्यक आहे.
nखरेदी केलेल्या साहित्याचे देयक ऑनलाइन सादर केल्यानंतर कृषी विभागामार्फत तपासणी केली जाते व त्यानंतर महाडीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.
महाडीबीटी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे.
- शंकर तोटावार, कृषी सहसंचालक, अमरावती