गावांचे नामफलक नसल्याने गैरसोय
By Admin | Published: May 17, 2016 02:46 AM2016-05-17T02:46:49+5:302016-05-17T02:46:49+5:30
निसर्गसौंदर्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाणे मावळकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे.
करंजगाव : निसर्गसौंदर्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाणे मावळकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे. मात्र, बहुतेक गावांत नामफलक नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. अनेकदा दिशाभूल होऊन त्यांचा वेळ वाया जातो.
नाणे मावळातील जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत आदी गावांत नामफलक नसल्याने नवख्या माणसांना गावाचे नाव विचारावे लागते. प्रत्येक गावाचे नाव दर्शविणारे फलक प्रमुख रस्त्यावर किंवा गावाकडे जाणाऱ्या उपरस्त्यांवर असणे अपेक्षित आहे.
जांभवली येथे काही अंतरावर कोंडेश्वर मंदिर, ढाक बहिरी, सोमवडी येथे टाटा धरण, उंबरवाडी येथे शिवकालीन वाघेश्वर मंदिर, गोवित्री येथे पशुवैद्यकीय दवाखाना, गोवित्री-साबळेवाडी फाटा येथे संत तुकाराम पादुका मंदिर, करंजगाव येथे कमळाचे प्राचीन तळे, शाळा, करंजगाव-कोंडिवडे यांच्या हद्दीतले परागमंदिर, उकसान येथे वडिवळे धरण, साईच्या डोंगरावरील पवनचक्क्या आहेत. इतर गावांमध्ये अनेक शाळा, दवाखाना, छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय असून, येथे शिवकालीन मंदिरे मोठ्या संख्येने आहेत. सर्वांत महत्त्वाचे येथील डोंगर खूप उंच आहेत. झाडीही अत्यंत दाट आहे. धरण, नदी असल्यामुळे येथील जमीन सुजलाम् सुफलाम् आहे. त्यामुळे या परिसरात विशेषत: रविवारी पर्यटकांची गर्दी जास्त असते. वाहतूक सुरू असते. प्रवासी, पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी विचारत पुढे जावे लागते. प्रशासनाने नामफलक बसवावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)