मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी किंबहुना त्यांच्या संशयास्पद हालचालींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यस्तरीय शिस्तपालन समितीची स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ज्या-ज्या नेत्यांनी पक्षविरोधी काम केले त्याबाबतचा आढावा घेऊन कारवाईच्या सूचना करणार आहे. अर्थात यात अजित पवारांचे बंड आणि त्यावर कारवाई याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार हेमंत टकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे.
राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. अजित पवारांनी त्यावेळी घेतलेल्या भूमिकेवरी ही समिती निर्णय घेऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना आधीच स्पष्ट केले होते की, अजित पवार यांच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय शिस्तपालन समिती घेईल. किंबहुना कारवाई निश्चित करण्यासाठीच या समितीची स्थापन करण्यात आल्याचे समजते. या शिस्तपालन समितीत सुरेश घुले, डॉ. संतोषकुमार कोरपे, अमरसिंह पंडित, जयवंत जाधव, नसिम सिद्धीकी, विजय शिवनकर, उषा दराडे, हरिष सणस, रवींद्र पवार आणि रवींद्र तौर यांचा समावेश आहे.