मुंबई : मुंबईतील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सोमवारी, ६ मार्चला शिक्षण निरीक्षकांसोबत सहविचार सभेचे आयोजन केले आहे. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाच्या चेंबूर येथील कार्यालयात दुपारी ३ वाजता ही सहविचार सभा पार पडेल. या सभेत विविध शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती परिषदेचे अनिल बोरनारे यांनी दिली.बोरनारे यांनी सांगितले की, मुंबईतील बऱ्याचशा शाळांमधील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रकरणांबाबत तक्रारी प्रलंबित आहेत. त्याअनुषंगाने ही सहविचार सभा आयोजित केली आहे. सभेत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपासून संस्थाचालक पातळीवरील प्रश्नांसह अनेक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांच्या वैयक्तिक सेवाशर्तीच्या समस्यांचे निवारण केले जाणार आहे. या सहविचार सभेला शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार, मुंबईच्या माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आनंद शर्मा उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील अतिरिक्त शिक्षक व समायोजनाची कार्यवाही, शिक्षक व शिक्षकेतरांच्या विमा संलग्न ठेव योजनेची प्रलंबित प्रकरणे, सेवा निवृत्त शिक्षक व शिक्षकेतरांची पेन्शन प्रकरणे, रजा रोखीकरण, वैद्यकीय प्रतिपूर्ती, रजा कालावधीतील नेमणुका, रात्र शाळांमधील समस्या, अपंग शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या पाल्यांचे प्रश्न, शासनाच्या विविध योजनांतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्या, संस्थांचे वेतनेतर अनुदान यांसह बदललेल्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण, डीएड धारक व कला, क्रीडा, संगीत विषयांच्या शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन अशा विविध प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. (प्रतिनिधी)>निवेदनाची प्रतशिक्षकांनी सहविचार सभेला येतांना आपल्या निवेदनाची एक प्रत घेऊन येण्याचे आवाहन शिक्षक परिषद उत्तर विभागाचे कार्यवाह सुभाष अंभोरे यांनी केले आहे.
शाळा व शिक्षकांच्या प्रश्नांवर सहविचार सभा
By admin | Published: March 06, 2017 5:29 AM