नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. आयुक्तांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी महापौरांसह नगरसेवकांनी केली आहे. आयुक्तांच्या कार्यपद्धतीविषयी नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांसह अविश्वास ठराव तातडीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ठराव पाठविण्यास विलंब होवू नये यासाठी सभेच्या शेवटी मंजूर केलेल्या ठरावाचे वाचन करून इतिवृत्तांत कायम करण्यात आले होते. शहरामधील प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगारांसह अनेक घटक प्रचंड नाराज असल्यामुळे आयुक्तांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी केली आहे. ठरावाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी आयुक्तांना नगरविकास विभागाने बोलावले असल्याची चर्चा शहरात सुरू होती.मनसेने मुंढे यांच्या समर्थनार्थ राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेवून पत्र दिले आहे. याशिवाय राजपत्रित अधिकारी संघटनेनेही तसे पत्र दिले. तर महापौरांसह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेत आयुक्तांना पालिकेत येऊ दिले जावू नये अशी मागणी केली. ते पालिकेत आल्यास कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे पत्रात म्हटले आहे.(प्रतिनिधी)नगरसेवकांचे आंदोलनमुख्यमंत्र्यांनी मुंढे यांची तत्काळ बदली केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. महापालिकेच्या मुख्यालयामध्ये व वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असे मत नगरसेवक व्यक्त करत आहेत. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही आयुक्तांनी विश्वास गमावला असून, आता शासनाने त्यांची विनाविलंब बदली करावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंढेंवरील अविश्वास ठराव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला
By admin | Published: October 27, 2016 1:36 AM