मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. या सुनावणीत बंडखाेर आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये. आयोग जो निर्णय देईल तो लोकशाही सुदृढ करणारा निर्णय असावा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी निवडणूक आयोगाला केले आहे.मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, घटनेच्या अभ्यासकांच्या मते अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा. जर ते अपात्र होणार असतील तर मग त्यांचा दावा निवडणूक आयोग कसा गृहीत धरू शकते, असा सवालही त्यांनी केला.
...तर उद्योगपती पंतप्रधान होतील !कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. जर पक्ष फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या देशातले दोन-तीन नंबरचे उद्योगपती आमदार-खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे ठाकरे म्हणाले.
‘कोर्टाला सल्ले देणाऱ्यांवर काय बोलू’ आम्ही न्यायप्रिय लोक आहोत. सर्वोच्च न्यायालयात सध्या प्रकरण आहे. न्यायदानावर आमचा विश्वास आहे. काही लोक सर्वोच्च न्यायालयाला मार्गदर्शन, सल्ले द्यायला लागले तर मी त्यांच्यावर काय बोलू शकतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.