डिंभे : काहीही करा; पण आम्हाला या धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढा, अशी कळकळीची मागणी बेंढारवाडी ग्रामस्थांनी रविवारी आंबेगावचे तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली.मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडून भूस्खलन झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून आज तहसीलदार रवींद्र सबनीस, तसेच व गटविकास अधिकारी डॉ. अतुल चिखले यांनी बेंढारवाडीची संयुक्त पाहणी केली. या वेळी ग्रमस्थांनी वरील मागणी केली. झालेली घटना अतिशय गंभीर असून बेंढारवाडीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी या वेळी दिली असून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाही झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूस्खलन व दरडींमुळे अतिसंवेदनशील झालेल्या बेंढारवाडी (ता. आंबेगाव) येथे भूस्खलनाचे प्रकार वारंवार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात अनेक दरडी कोसळल्या असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेली पक्की सडक वाहून गेली होती. दांगटवाडी या आदिवासी वस्तीच्या वरील बाजूस एक मोठी भेग पडली असून दरवर्षी या भेगेची रुंदी व खोली दोन-दोन फुटांनी वाढत आहे. तळपेवस्ती या सुमारे दहा ते बारा घरे असणाऱ्या लोकवस्तीच्या वरील बाजूला डोंगरावर असणाऱ्या सागाच्या झाडांची दिशा बदलून ही झाडे खालील बाजूस झुकू लागली आहेत. कोटमवडी येथील मारुती गोविंद भवारी या शेतकऱ्याच्या घराजवळ दोनशे फुटांपर्यंत भूस्खलन होऊन मोठमोठ्या दरडी खाली आल्या आहेत. या शेतकऱ्याचे शेततळे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जर ही दरड ५० फूट अलीकडे कोसळली असती तर ही दरड थेट त्यांच्या घरावर कोसळली असती. अजूनही येथे लहान-मोठ्या दरडी सुटत असून घराच्या वरील बाजूस कोसळलेले मोठे झाड धोकादायक स्थितीत आहे. कोसळणाऱ्या दरडी व भूस्खलनामुळे, डोंगर दिसला, की येथील रहिवाशांच्या छातीत धडकी भरत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. (वार्ताहर)>‘लोकमत’च्या वृत्तानंतर आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे व गटविकास अधिकारी डॉ. चिखले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आज तहसीलदार व गटविकास अधिकारी रवींद्र सबनीस यांनी बेंढारवाडीसह मेघोली व जांभोरीची काळवाडी या गावचीही पाहणी केली.
काहीही करा; पण आम्हाला धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढा
By admin | Published: August 22, 2016 12:59 AM