मुंबई : मराठी भाषा भवनासाठी स्थळ निश्चित न करता सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अजून कागदावरच आहे. मराठी भाषा भवन गुजरातमध्ये बांधू नका म्हणजे मिळवले, असा मार्मिक टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला लगावला आहे.वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.विखे पाटील म्हणाले, मराठी भाषा भवनाच्या वारंवार घोषणा केल्या जात आहेत. पण ते कुठे होणार, हे निश्चित नाही. कधी रंगभवन, धोबीतलाव तर कधी नवी मुंबईत होणार असल्याचे सांगितले जाते. इतर स्मारकांसारखी या भवनाची गत होऊ नये. राज्य सरकारकडे संमतीसाठी पडून असलेले मराठी भाषा धोरण लवकरात लवकर निश्चित केले पाहिजे. भाषेची अस्मिता जपणारे निर्णय प्राधान्याने घेण्याची गरज आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाचा केवळ इव्हेंट होऊ नये. पुढच्या पिढ्यांसाठी भाषेच्या संवर्धनाच्या माध्यमातून फार मौलिक वारसा आपण निर्माण करीत आहोत, ही जाणीव ठेवून निर्णय घेण्याची आणि त्यासाठी मराठी भाषा विभागाला भरीव तरतूद देण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही विखे यांनी व्यक्त केली.
किमान मराठी भाषा भवन तरी गुजरातमध्ये बांधू नका - विखे पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:55 AM