Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्राच्या जनादेशाने सगळ्यांनाच धक्का दिला. महाविकास आघाडीची अवस्था वावटळीतील पालापाचोळ्यासारखी झाली. महायुतीने तब्बल २३० जागांवर विजय मिळवत पुन्हा सत्तेत वापसी केली. लोकसभेला बसलेल्या धक्क्यातून सावरत भाजपने तब्बल १३० पेक्षा अधिक जागांवर गुलाल उधळला. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार असे स्पष्ट दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह महाराष्ट्र भाजपकडून केला जात आहे. याबद्दल फडणवीसांच्या कन्या दिविजाला विचारण्यात आलं.
भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीसने प्रतिक्रिया व्यक्त केली.
"मी खूप आनंदी आहे की, सर्वांनी आम्हाला खूप भरभरून पाठिंबा दिला. आमच्यासाठी हे खूप आहे. आम्हाला पाठिंबा देत रहावं. आम्ही तुमच्यासाठी काम करत राहू. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी जे करावं लागेल, ते भाजप करेल, याबद्दल मला खात्री आहे", असे दिविजा म्हणाली.
मुख्यमंत्र्यांबद्दल काय वाटतं, तुला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे का? असा प्रश्न दिविजाला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, "हे ते (पक्ष) ठरवतील. मला खात्री आहे की, ते (पक्ष) जो काही निर्णय घेईल, तो परफेक्ट (योग्य) असेल", असे दिविजा म्हणाली.
भाजपने एकट्यानेच मारली बहुमताच्या उंबरठ्यापर्यंत मजल
लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर भाजपने निवडणुकीचं सुक्ष्म पातळीवर नियोजन केले. त्याचा जबरदस्त फायदा झाल्याचे निकालानंतर दिसून आले. भाजपने एकट्यानेच बहुमताच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली.
महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा १४४ इतका आहे. भाजपला एकट्यालाच १३३ जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीतील दोन मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार मुसंडी मारली आहे.
शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५७ जागांपर्यंत मजल मारली. तर लोकसभा निवडणुकीत जबर धक्का बसलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तब्बल ४१ जागा जिंकल्या आहेत.