कऱ्हाड : कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. डॉ. महेश शामराव पवार (वय ३८, मूळ रा. पाल, ता. कऱ्हाड, सध्या रा. तारळे, ता. पाटण) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पाल येथील डॉ. महेश पवार याचा दि. ३ जून २००५ रोजी कुमठे येथील राजश्री यांच्याशी विवाह झाला. राजश्री यासुद्धा डॉक्टर होत्या. विवाहानंतर पाटण तालुक्यातील तारळे येथे दोघांनी स्वतंत्र रुग्णालये सुरू केली. त्यावेळी हे दाम्पत्य त्याचठिकाणी राहण्यास होते. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु झाला. अशातच दि. २० नोव्हेंबर २००७ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास डॉ. राजश्री यांना कऱ्हाडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्या बेशुद्ध होत्या. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्या जखमी झाल्याचे सांगण्यातआले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. राजश्री यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले. त्याबाबत मृत राजश्री यांचे वडील अर्जुन सावंत (रा. कुमठे, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिस ठाण्यात डॉ. महेश पवार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पी. के. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्या. एम. आर. देशपांडे यांनी डॉ. महेश पवारला जन्मठेप, तीन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)
गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेप
By admin | Published: May 17, 2016 6:02 AM