मुंबई : धनगर समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणापासून वंचित राहिल्या. अनेक नेत्यांनी प्रश्न सोडवू असे म्हणत आमदारकी, खासदारकी आणि मंत्री पदे मिळवली. तरीही समाजाला न्याय मिळाला नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत आहे. धनगर समाज माझा आहे. त्यांना आरक्षण देण्यासाठी जे काही करता येईल, ते ते सर्व राज्य सरकार करेल. केंद्राकडे जायचे असल्यास एकत्रितपणे केंद्राकडे जाऊ. धनगर आरक्षणाची चिंता फक्त तुम्हालाचा आहे असे समजू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत भाजपला फटकारले.काँग्रेस सदस्य रामहरी रूपनवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला होता. भाजप सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजीला सुरूवात केली. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. तुम्हाला फक्त गोंधळ घालायचाच असेल तर मी उत्तर देणार नाही. आधी विरोधकांनी शांत बसावे, असे सुनावले. एकमेकांशी हमरतुमरी करण्यापेक्षा आधी प्रश्न समजावून घेऊ आणि तो सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असे ठाकरे म्हणाले.टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि महाधिवक्ता यांचा अभिप्राय यावर चर्चा करण्यासाठी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी शुक्रवारी त्यांच्या दालनात बैठक बोलावली आहे.
तुम्हालाच धनगर आरक्षणाची चिंता आहे असे समजू नका; मुख्यमंत्र्यांनी फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 4:35 AM