डोर्लेवाडीला विद्यार्थ्याचा शाळेतच मृत्यू
By admin | Published: July 15, 2017 01:30 AM2017-07-15T01:30:13+5:302017-07-15T01:30:13+5:30
(ता. बारामती) येथील खासगी प्राथमिक विद्यालयात चक्कर आल्याचे निमित्त होऊन शालेय विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोर्लेवाडी : (ता. बारामती) येथील खासगी प्राथमिक विद्यालयात चक्कर आल्याचे निमित्त होऊन शालेय विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेमुळे डोर्लेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
डोर्लेवाडी येथील संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी (दि. १४) इयत्ता ७ वी मध्ये शिकणारा ओंकार सुनील देवकाते हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आला. आज सकाळी १० वाजता तो शाळेत आला. दुपारी शाळेत १५ आॅगस्टची तयारी, सराव सुरू होता. मात्र, घसा खराब असल्याने त्याने त्या सरावामध्ये सहभाग घेतला नाही.
या वेळी दुपारी पावणेएक वाजता तो एका वर्गातून दुसऱ्या वर्गात निघाला होता. यादरम्यान दुसऱ्या वर्गात जाताना तो विद्यार्थी चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला बारामतीमध्ये लगेच रुग्णालयात आणण्यात आले. या वेळी त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. तपासणीनंतर आेंंकार याचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या मृत्यूचे कारण अजून समजले नाही.
त्याचे वडील सुनील देवकाते यांनी सांगितले, की गेल्या दोन दिवसांपासून तो आजारी होता. या आजारपणातून आज त्याला थोडे बरे वाटत होते. त्यामुळे त्याला शाळेत पाठविले. आमच्या नशिबाने आमच्यावर ही वेळ आली आहे. माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही. जे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात, त्यांना घेऊ द्या, त्यांना काही अडचण येऊ देऊ नका, याबाबत माझी पत्रकारांना विनंती आहे.
दरम्यान, मागील ३ महिन्यांपूर्वीदेखील याच शाळेतील चैत्यन्या मासाळ या विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूल बसखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर चौथ्या महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली. ओंकार याच्या मृत्यूमुळे
पुन्हा आज ही शाळा चर्चेत
आली आहे. झारगडवाडी परिसरात आज या विषयावर तर्कवितर्कांना उधाण आले होते.