पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या सहयोगाने पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत दिनांक ७ व ८ एप्रिलला अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे, संमेलनाच्या अध्यक्षपदी लोककला आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे, अशी माहिती अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दोन दिवसीय संमेलन होणार आहे. स्वागताध्यक्षपदी भाऊसाहेब भोईर यांची निवड झाल्याचे लोकरंग सांस्कृतिक मंचाचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे यांनी जाहीर केले होते.
स्वागताध्यक्षांनी आज संमेलनाध्यक्षांची निवड केली. याविषयी भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘लोककला परंपरा आणि कलामहर्षींचा गौरव करण्यात यावा. तसेच महाराष्ट्राच्या अस्सल संस्कृतीचे दर्शन स्मार्टसिटीतील नागरिकांना घडावे, यासाठी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन आयोजित केले आहे. १ ले संमेलन मुंबईत, २ रे संमेलन कराडला झाले होते. ३ रे संमेलन औद्योगिकनगरी मध्ये होत आहे. यापूर्वी अध्यक्षपद सुलोचना चव्हाण, डॉ. प्रकाश खांडगे यांनी भूषविले आहे.
अध्यक्षनिवडीविषयी भोईर म्हणाले, ‘‘शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात डॉ. देखणे यांचे योगदान आहे. संत साहित्यांचे अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचन कार, बहुरूपीभारूडकार, फर्डे वक्ते, लोककलांचे अभ्यासक अशी त्यांची अनेक रूपं आहेत. त्यांच्या ओजस्वी वाणीने महाराष्ट्राच्या मनावर गारूड केले आहे. म्हणून त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड केली आहे. संमेलनासाठी विविध समित्याही निर्माण केल्या आहेत. मुख्य निमंत्रक म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांची निवड केली आहे. तसेच स्वागत समितीअध्यक्षपदी महापौर नितीन काळजे यांची, संयोजन समिती अध्यक्षपदी डॉ. प्रकाश खांडगे यांची निवड केली आहे. यासमितीत राजेशकुमार सांकला, राही भिडे, कृष्णकुमार गोयल, हेमेंद्रभाई शहा, सचिन इटकर, शैलजा खांडगे, संजय भुस्कुटे, सुनील महाजन, दीपाली शेळके यांचा समावेश आहे.’’
संमेलनाध्यक्षांची ओळखडॉ. देखणे यांची ललित संशोधनात्मक, चिंतनात्मक अशी ४७ पुस्तके प्रसिद्ध झालीआहेत. कथा कादंबरी संत साहित्यावरील चिंतनात्मक, लोकसाहीत्यावरील संशोधनात्मक आणि सामाजिक विषयावरील वैचारिक ग्रंथ तसेच बालसाहित्याचा समावेश आहे. नाथांचे बहुरूपी भारूड यावर संशोधन केले असून त्यांच्या बहुरूपी भारुडाचे २१०० हून अधिक प्रयोग केले आहेत.