औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपी सचिन अंदुरेला सीबीआयने अटक केली आहे. सचिन अंदुरेच्या अटकेनंतर याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. एटीएसच्या पथकाने मंगळवारी पहाटे सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घराची झडती घेतली असून त्यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे औरंगाबादमधील पैठण रोड आणि देवळाई येथील सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी एटीएसच्या पथकाने धाड टाकली. यावेळी त्यांच्याकडून काही स्फोटकांचा साठा जप्त केल्याचे समजते. तसेच, त्यांना एटीएसने ताब्यात घेल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते.
दरम्यान, नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला अटक करण्यात आली आहे. सचिन औरंगाबादमध्ये एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करत होता. सचिन अंदुरेनेच नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.