चालक सुरक्षित, तर एसटी सुरक्षित! -दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:45 AM2018-02-26T03:45:55+5:302018-02-26T03:45:55+5:30
रायगड जिल्ह्यात दोन एसटींच्या धडकेत झालेल्या अपघातात किरण कोळी या मुंबई आगारातील चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले.
मुंबई : रायगड जिल्ह्यात दोन एसटींच्या धडकेत झालेल्या अपघातात किरण कोळी या मुंबई आगारातील चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले. कोळी यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची भेट घेत परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी बसच्या मजबूत बांधणीसंदर्भात अधिकारी वर्गाला सूचना दिल्या आहेत. ‘एसटीचा चालक सुरक्षित असेल, तरच एसटी सुरक्षित राहू शकते’, असे उद्गार रावते यांनी या वेळी काढले.
नायर रुग्णालयात कोळी यांची भेट घेतल्यानंतर रावते यांनी तातडीने पुण्यातील दापोडी येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेला भेट दिली. त्या वेळी उपस्थित अधिकारी व कामगारांशी रावते यांनी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. या वेळी रावते म्हणाले की, अपघात एका दुर्दैवी क्षणाचा परिणाम असतो. अशा दुर्दैवी अपघातामध्ये कमीत कमी मानवी हानी होईल, अशा पद्धतीने बसची मजबूत बांधणी करण्याच्या मार्गदर्शक सूचना उपस्थित अधिकाºयांना दिल्या आहेत.
कोळी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून रावते यांनी एसटी महामंडळाकडून मदत करण्याचे आश्वासनही या वेळी दिले.
एका चालकाच्या अपघातानंतर एवढी संवेदनशीलता क्वचितच राजकीय नेतृत्वामध्ये दिसून येते. त्यादृष्टीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत त्यांचे आभार मानायला हवेत. विशेषत: चालकाच्या सुरक्षेसाठी कार्यशाळेतील अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधून दिलेल्या सूचनांमुळे नक्कीच एसटी चालक व वाहकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस - महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस