लोकमत न्यूज नेटवर्कनिमोणे : हल्लीच्या बँजो, डीजेच्या युगातही ‘सनई ताफ्या’सारखी पारंपरिक वादनकला टिकुन आहे. डीजेवरील बंदीची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे या पारंपरिक वाद्यांना आता सुगीचे दिवस आहेत. कोणतेही मंगलकार्य असेल तर त्यात वाद्ये आलीच! लग्नाची वरात आणि मिरवणुकीत तर एखाद्या पारंपारिक वाद्यांचा ताफा हवाच असतो. त्यात ढोल, लेझिम, झांज यांच्यासोबत हमखास सनई ताफा असे. परंतु कधी काळी कानाला मंजुळ सुरांची साद घालत ऐकणाऱ्याला देहभान विसरून लावणारी मंगल ‘सनई’ लुप्त होते की, काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. २१ व्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्याने अनेक माहितीची आणि ज्ञानाची दालने खुली झाली. नव्या बदलांचा वेग प्रचंड वाढला.जीवनशैली प्रचंड बदलली आणि त्याचे सर्वच घटकांवर चांगले वाईट परिणाम जाणवू लागले. घरातील लग्नासारखी मंगलकार्ये घर सोडून हॉलमध्ये आली. लग्नसोहळा काही तासांचा धनी झाला. हळद, आहेर, मानपान, रुखवत, वर ओवाळणी या बाबी जशा विवाह समारंभातून हद्दपार झाल्या, त्याचप्रमाणे सनईताफासुद्धा! सनई ताफ्याच्या जागेवर प्रारंभी युरोपियन पद्धतीचा बँड, नंतर बँजोपार्टी आणि नंतर मात्र डीजेने सर्वांवर मात केली. कानठळ्या बसवत हृदयाची धडधड वाढवणाऱ्या प्रचंड आवाजाच्या मोठमोठ्या भिंतींनी प्रचंड प्रमाणात धुमाकुळ घातला. सुप्रीम कोर्टाच्या बंदीनंतर या डीजेवर काहीसे निर्बंध आले. मात्र या न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण अंमलबजावणीच होत नसल्याने डीजेचा आवाज कायम आहे.काही कुटुंबानी पारंपरिक कला जाणीवपूर्वक जिवंत ठेवली आहे. वयोवृद्ध वादक अद्यापही या कलेची सेवा करत आहेत. या सनई ताफ्यामध्ये मुख्ये वाद्य म्हणजे सनई. त्याच्या साथीला सूर, ताशा, ढोलकी, हलगी, संबळ इ.वाद्यांचा ताफ्यामध्ये समावेश असतो. साधारण दहा ते पंधरा वादकांची संख्या असते. लग्नसमारंभामध्ये सनई ताफा असेल तर ज्येष्ठांना तसेच यातील दर्दींना एक अनोखी मेजवाणीच ठरते. सनईचे मंजुर सूर घुमायला लागले म्हणजे रसिक मंत्रमुग्ध होऊन, तहानभूक विसरून या रसात पूर्णपणे न्हाऊन जातात. मात्र, या कलेची थोडीफार जाण असावी लागते.सध्या या कलेचा खडतर प्रवास चालू आहे. अनेक स्थित्यंतरातून ती जात असताना ही कला जिवंत ठेवण्याचे महान कार्य काही बुजुर्ग कलाकारांनी केले आहे. डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजास सर्वच वैतागले आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने डीजेवर बंदी आणल्याने त्याच्या वापरावर निर्बंध आलेत. मात्र बंदी पूर्णपणे अंमलात आल्यास या पारंपारिक सनई ताफ्यास पुन्हा वैभवाचे दिवस येतील .कलेच्या माध्यमातुन आम्हाला आर्थिक प्राप्तीपेक्षा कला सादर करायला आवडते. याला प्रेक्षकवर्ग मिळावा, हीच एकमेव इच्छा. - याकुबभाई माणियार, ज्येष्ठ ताशावादक, निर्वीया कलेस राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाल्यास कलेला चांगल्या प्रकारचे दिवस येतील. - मुनिरभाई मणियार, ज्येष्ठ ढोलवादक, पारगावडीजेवरील बंदी काटेकोरपणे अंमलात आणावी व सर्व पारंपारिक वादकांस निवृत्तीवेतन मिळावे. - सुदामराव पवार, जेष्ठ सनईवादक, सविंदणे
डीजेबंदीमुळे पारंपरिक वाद्यांना सुगीचे दिवस
By admin | Published: May 29, 2017 2:02 AM