३२ वर्षाच्या पोरानं तुमची झोप उडवलीय; भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांना हाणले टोले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 05:14 PM2023-11-24T17:14:48+5:302023-11-24T17:15:27+5:30
खळा बैठक म्हणजे भारतीय बैठक. भारतीय बैठकीचा सखोल असा अर्थ आहे. अनन्य साधारण असे महत्त्व या बैठकीचे आहे असं भास्कर जाधव म्हणाले.
चिपळूण - केवळ आदित्य ठाकरेंच्या तोंडावर बोलतोय असं नाही. तर मी जाणीवपूर्वक उल्लेख केला की आपले उद्याचे नेतृत्व, महाराष्ट्राचे भवितव्य आदित्य ठाकरे आहेत. राज्यात विविध पक्ष आहेत. हे पक्ष सकाळ-संध्याकाळ कुणावर टीका करतायेत तर उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेंवरही करतायेत. त्याला आदित्य ठाकरेंनी एकच उत्तर दिलंय.पण ३२ वर्षाच्या तरुणाने तुमची झोप उडवलीय अशा शब्दात आमदार भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
भास्कर जाधव म्हणाले की, पुण्यात सभा झाली तेव्हा काँग्रेस नेता व्यासपीठावर आला. तो म्हणाला,मी आदित्य ठाकरे तुमच्यावर प्रेम करतो. केवळ तुम्ही बाळासाहेबांचे नातू म्हणून नव्हे तर ज्यावेळी तुमच्या वडिलांना ४० लांडग्यांनी, कोल्हे कुत्र्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही वाघाची झेप घेतली आणि बापाच्या पाठीमागे उभा राहिला म्हणून मी तुमच्यावर प्रेम करतो. विरोधक काहीही म्हणू दे, आमच्याकडेही उत्तरे आहेत. आम्ही ती वेळोवेळी सभेतून देत असतो. जरूर, सोन्याचा चमचा घेऊन आदित्य ठाकरे जन्माला आले, परंतु ते आपल्या मातीला विसरले नाही त्याची साक्ष म्हणजे ही खळा बैठक असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मी सातत्यानं २ दिवस एका गोष्टीचा विचार करतोय, आदित्य ठाकरेंनी जी खळा बैठक आयोजित केलीय म्हणजे काय, तर ही खळा बैठक म्हणजे भारतीय बैठक. भारतीय बैठकीचा सखोल असा अर्थ आहे. अनन्य साधारण असे महत्त्व या बैठकीचे आहे. आज आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना जुनी माणसं आम्हाला सांगतात, इथं बाळासाहेब आले होते, इथं बाळासाहेब बसले होते. इथं जेवण केले होते..हा जो ठेवा आहे तो अनेकांनी हृदयात जतन करून ठेवलाय. केवळ जतन केला नाही तर हा ठेवा शिवसेनेच्या पदरात योगदान टाकायचे असेल तर ती जुनी माणूस कोणाच्याही निमंत्रणाची वाट पाहत नाही. फक्त बाळासाहेबांची आठवण करतात आणि तो वाटा शिवसेनेच्या पदरात टाकतात असं भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान, आज २ मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी इथं बसलेत. १९९९ साली शिवसेनाप्रमुख कोकणच्या दौऱ्यावर आले होते. तो प्रसंग आठवा, त्याचरितीने आज आदित्य ठाकरे इथं आले आहेत. आदित्य ठाकरेंवर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला. कुठल्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान नाही. कुठल्याही नियमांचा भंग नाही. केवळ जनतेसाठी एका पूलाचे उद्घाटन केले, काम झाले परंतु उद्घाटन करत नव्हते. म्हणून जनतेशी बांधिलकी जपत आदित्य ठाकरेंनी पूलाचे उद्घाटन केले. अशी अनेकजण उद्घाटन करतात परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही. आज आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. या दौऱ्याची तुलना बाळासाहेबांच्या त्या दौऱ्याशी करा आणि तुम्ही आदित्य ठाकरेंना विश्वास द्या, तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आवाहनही भास्कर जाधव यांनी लोकांना केले.