"पंतप्रधान मोदींच्या काळात बँकांमधील 'फ्रॉड'ची संख्या वाढली"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 02:28 PM2020-02-05T14:28:16+5:302020-02-05T14:33:34+5:30
मागील तीन वर्षात बँकांमधील 'फ्रॉड'ची संख्या झपाट्याने वाढल्याचे रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते.
मुंबई : हिरे व्यापारी असलेले नीरव मोदी, उद्योगपती विजय माल्ल्या सारखे अनेकांनी देशातील बँकांना चुना लावला असून ही लोकं घोटाळे करून पसार झाली आहे. त्यामुळे सामान्य खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून याचा मोठा फटका सरकाराला सुद्धा बसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तर मोदींच्या काळात बँकांमधील 'फ्रॉड'ची संख्या वाढली असल्याचा आरोप सुद्धा राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.
मोदी सरकारच्या काळात बँकांमधील घोटाळे, बनावट कर्ज, डेटा चोरी, हॅकिंग, सायबर हल्ले यांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढत आहे. कोट्यवधींचे कर्ज बुडवून आणि घोटाळे करून अनेक मोठमोठे उद्योजक मोदी सरकारच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. तरीही घोटाळे रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
मागील तीन वर्षात बँकांमधील 'फ्रॉड'ची संख्या झपाट्याने वाढल्याचे रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते. चालू आर्थिक वर्षात बँका आणि वित्त संस्थांमध्ये १ लाख १३ हजार ३७४ कोटींचे घोटाळे झाले तर २०१६-१७ या वर्षात बँकांमधून ४१ हजार १६७ कोटींचे घोटाळे समोर आले होते. खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असतानाही केंद्र सरकारला जाग येत नाही हे निश्चितच चिंताजनक असल्याचा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.